पोलीस आणि प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींची गर्दी, दोन्ही मोठय़ा प्रवेशद्वारांना लावलेली भली मोठ्ठी कुलुपे, छोटय़ा दरवाजातून बाहेर डोकावणारे अस्वस्थ रहिवासी, प्रवेशद्वाराच्या आत कारवाई टाळण्यासाठी म्हणून सुरू असलेले होमहवन, राजकीय नेत्यांची सांत्वनाभेट आणि रिपाईची आक्रमक नारेबाजी अशा वातावरणात शुक्रवारी सकाळी कॅम्पाकोलावरील कारवाई अखेर सुरू झाली. बेस्ट आणि महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह पालिका अधिकारी कॅम्पाकोलाजवळ पोहोचले. पण रहिवाशांचा कडवा विरोध आणि राजकीय कार्यकर्त्यांचा गोंधळ यामुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ कारवाईसाठी प्रयत्न करून सकाळी थकून माघार घेतलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी पुन्हा सायंकाळी धडक दिलीच. या सर्व कारवाईचे त्यांनी व्हिडीओ चित्रीकरणही केले आहे.
विविध कारणांमुळे पुढे ढकलली गेलेली कारवाई शुक्रवारी होणार या धास्तीनेच वरळीच्या कॅम्पाकोलामध्ये सकाळ झाली. सकाळी सात वाजल्यापासूनच कॅम्पाकोला कम्पाऊंडमध्ये रहिवाशीची वर्दळ सुरू झाली. काही वेळातच त्यात भर पडली ती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची. कॅम्पाकोला कम्पाऊंडच्या दोन्ही प्रवेशद्वारांना भले मोठ्ठे कुलूप ठोकण्यात आले होते. मध्येच रहिवासी छोटय़ा दरवाजाने रस्त्यावर येऊन एकंदर परिस्थितीचा अंदाज घेत होते. कम्पाऊंडबाहेर पोलिसांचा ताफा सज्ज होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांवर करडी नजर ठेऊन असलेले पोलीस कम्पाऊंडमधील हालचालींवरही बारीक लक्ष ठेऊन होते.
सकाळी आठच्या सुमारास गुरुजी (भटजी) आले आणि कम्पाऊंडमध्ये हालचालींनी वेग घेतला. एका बाजूला ठेवलेल्या विटा रचून तरुणांनी गुरुजींच्या मदतीने दोन्ही प्रवेशद्वारांच्या आत होमकुंड तयार केले. होमकुंडाच्या अवतीभोवती लाल गालिचे अंथरण्यात आले आणि रहिवासी होमकुंडाच्या सभोवताली जमले. गुरुजींनी मंत्रोच्चारण सुरू केले आणि आपल्या अनधिकृत सदनिकांवर आलेले संकट टळावे यासाठी होमकुंडात समिधांची आहुती सुरू झाली. तेवढय़ात दक्षिण मुंबईतील नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत, शिवसेनेचे माजी नगरसेवक आशीष चेंबुरकर, भाजपच्या नेत्या शायना एन. सी. तेथे थडकले आणि रहिवाशांनी त्यांना गराडाच घातला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा आपल्याकडून अवमान होऊ नये याची मात्र ही सर्व मंडळी काळजी घेत प्रसारमाध्यमांशी बोलत होती. तेवढय़ात दक्षिण मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांचा एक जत्था तेथे पोहोचला आणि आता मनसे स्टाइल आंदोलन होते की काय असा प्रश्न सर्वानाच पडला. तोपर्यंत पोलिसांची वाढीव कुमक कॅम्पाकोलाच्या बाहेर दाखलही झाली होती. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांचा शांतपणा रहिवाशांच्याही मनाला बोचून गेला.
रिपाई कार्यकर्ते कॅम्पाकोलावासीयांचे संरक्षण करतील अशी राणा भीमदेवी थाटात रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी घोषणा केली होती. मात्र सकाळपासून रिपाई कार्यकर्ते कुठेच दृष्टीस पडत नव्हते. साडेअकरा वाजले आणि पालिका अधिकारी बेस्ट व महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी कॅम्पाकोलाच्या प्रवेशद्वारावर अवतरले. त्यांच्या पाठोपाठ रिपाई कार्यकर्तेही थडकले आणि त्यांनी आक्रमक नारेबाजी सुरू केली. पोलीस बळाचा वापर करून कॅम्पाकोलामध्ये प्रवेश न करता प्रवेशद्वाराबाहेरूनच रहिवाशांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही रहिवाशांना जाणीव करून देण्यात आली. परंतु तब्बल तीन तास संवाद साधल्यानंतरही प्रवेशद्वार न उघडल्याने अधिकारी वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी माघारी फिरले. मात्र जाताना पुन्हा चार वाजता येऊ, असे त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यांच्यासोबत बेस्ट व महानगर गॅस कंपनीचे कर्मचारीही निघून गेले. उरले ते केवळ पोलीस, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि रहिवाशी.