शाहू, फुले, आंबेडकराचे पुरोगामी राज्य अशीच महाराष्ट्राची ओळख आहे, आता तो टग्यांचा करावयाचा आहे काय, केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांना ते मान्य आहे काय असा थेट सवाल करत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आज कर्जत येथे शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले.
बाळासाहेब विखे हे आज कर्जत तालुक्याच्या दुष्काळी दौरा करण्यासाठी आले होते. सकाळी मांदळी पासून त्यांच्या दौऱ्याची सुरवात झाली. त्यांनतर मिरजगांव, माहीजळगांव, बहीरोबावाडी येथे त्यांनी भेटी दिल्या. कर्जत येथे दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात विखे यांनी उपमुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून राष्ट्रवादीवर थेट टिका केली. मेळाव्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे, बापुसाहेब गुंड, अंबादास पिसाळ, प्रवीण घुले, राहुल झावरे, रविद्र मासाळ, राजकुमार आंधळकर, दादासाहेब सोनमाळी यांच्यासह विविध पक्षांमधील विखे समर्थक उपस्थित होते.
विखे यांनी भाषणाच्या सुरवाती पासून अजीतपवार व पालकमंत्री बबनराव पाचपूते यांच्यावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात टग्यांचे राज्य अणावयाचे काय असा प्रश्न आता पडतो. या टग्यांनी सिंचन विभागात काय उद्योग केले हे मला विचारा. जर फार जोर आहे तर तो रात्री जिथे दाखवयाचा तिथे दाखवा, जनतेला काय दाखवता? आम्ही पण टगेच आहोत. ज्याच्या हातात ससा तो पारधी हे आता थांबले पाहिजे. शरद पवार हे अतिशय चांगले राजकारणी आहेत. त्यांनी असे राजकारण कधी केले नाही. मात्र त्यांनाच मी आता विचारणार आहे की, आपणास टग्यांचे राजकारण मान्य आहे काय?
आमदार राम शिंदे म्हणाले, कर्जतचे प्रांतधिकारी हे अधिकारी नसून घाऊक व्यापारी आहेत. त्यांनी दुकानदारी सुरू केली आहे. त्यांनीही पालकमंत्र्यांवर टीका केली. ते प्रत्येक गोष्टीला राजकारणाचा रंग देतात असा आरोप त्यांनी केला.
पालकमंत्री पदच रद्द करा!
जिल्ह्य़ाचा पालकमंत्रीच लोकांना छळत आहे. छळणारे पालकमंत्री हवेच कशाला त्यापेक्षा राज्यात कोठेच पालकमंत्री ठेवू नका, ही पध्दतच बंद करा अशी मागणी विखे यांनी केली.
ते म्हणाले, या पालकमंत्र्याने साधूसंताची पण थट्टा केली. शेतकऱ्यांना दु:ख देऊन व जनावरांना उपाशी पोटी हंबरडा फोडायला लावून राष्ट्रवादीने आता खासदार व आमदारकीचे स्वप्न पाहू नये. कितीही पैसे वाटा पण लोक मते इतरांना देतील हे लक्षात ठेवा असा इशारा विखे यांनी दिला. या मंत्र्यांनी जनावरांचीसुध्दा पक्षात वाटणी केली, याचे मोठे दुख आहे असे ते म्हणाले.