‘दहा हजार रुपये गुंतवा व दोन वर्षांत दामदुप्पट कमवा’ ही योजना राबविणाऱ्या परभणीतील कॅपझोन ट्रेडर्स प्रा. लि. कंपनीवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. कॅपझोनचा प्रमुख रवींद्र वसंत चौधरी (यवतमाळ) पसार झाला असून इतर तीन एजंटांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. चौधरीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक यवतमाळला रवाना झाले. कॅपझोनवर गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदारांत मोठी खळबळ उडाली आहे.
बुधवारी मध्यरात्रीनंतर सहायक पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून कॅपझोनचा प्रमुख रवींद्र चौधरी, परभणीत कॅपझोनचा व्यवहार पाहणारे रमेश नारायण शहाणे, आश्रोबा नामदेव डोंगरे, बाबुराव खंदारे, श्रीराम वामन राऊत व इतरांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गुरुवारी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्या. आर. बी. गिरी यांनी आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कार्यालयावर छाप्यात पोलिसांनी ९ लाख ५५ हजार १०० रुपये रोख रक्कम व काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई झाली. दहा हजार व त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्यांना दोन वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याची योजना या कंपनीच्या वतीने चालविण्यात येत आहे.
१०, २०, ५० हजार व त्यापुढे एक लाखाच्या पटीत रक्कम गुंतवा व दोन वर्षांत दामदुप्पट करा, अशी योजना कॅपझोनतर्फे परभणीत १५ ऑगस्ट २०१२ पासून चालविली जात आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत जिल्ह्य़ातील जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदार या कंपनीशी जोडले गेले आहेत.
या कंपनीने ठेवीदारांना आमिष दाखविण्यासाठी सुरुवातीला काही लोकांना चार ते सहा महिन्यांतच दामदुप्पट रक्कम दिली. त्यामुळे अनेक लोक फसले गेले.
कॅपझोनचे खाते विसावा कॉर्नरजवळील राजर्षी शाहूमहाराज मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी या बँकेत आहे. या बँकेचे धनादेश ठेवीदारांना दिले आहेत. कॅपझोन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक चौकशी केली असता या कंपनीच्या बँक खात्यावर केवळ दहा हजार रुपये असल्याची माहिती समोर आली.