कर्करोगासारखा दुर्धर रोग जडीबुटीच्या साह्य़ाने बरा करण्याचे आश्वासन देऊन आपल्या सुशिक्षित बहिणीला भोंदू महाराजाने फसविल्याची तक्रार भावाने केल्यानंतर कळंब पोलिसांनी पार्डी सुकळी येथील विनायक जाधव महाराज नावाचा बुवा व त्याच्या अजित चौधरी नावाच्या साथीदाराविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपूरच्या अतुल शेषराव नाईक यांच्या बहिणीचे वर्धा येथील एका अभियंत्यासोबत लग्न झाले आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने आजारी आहे. सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार करुन थकलेल्या या बहिणीने कळंब तालुक्यातील पार्डी येथील विनायक जाधव नावाच्या बुवा महाराजाकडून जडीबुटी औषध म्हणून घेतले कर्करोग कायमचा बरा करण्याची शाश्वती जाधव महाराजाने दिली होती. मात्र, त्याच्या जडीबुटीचा काहीही फायदा झाला नाही.रक्ताच्या नात्याची बहीण दिवसेंदिवस मृत्यूच्या दाराकडे वाटचाल करीत असताना अतुल नाईक हतबल झाले होते. कर्करोगाची गाठ टय़ूमरमध्ये परावर्तित झाली असून जानेवारीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, उपचारच न झाल्याने टय़ूमरने शरीराच्या अन्य अवयवांचेही मोठे नुकसान केले आहे.
हा प्रकार महाराजाच्या थापेबाजीमुळे घडल्यामुळे या महाराजाविरुध्द फसवणुकीची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी भांदविच्या ४२० आणि  मॅजिक अॅक्टच्या कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. हा बाबा सुकळी पारडी गावातून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पत्नी मृत्यूच्या दारात पोहोचल्यानंतरही पती सुनील मिसाळ याने या प्रकरणात बाबाची काहीच चूक नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिल्याने अंधश्रद्धेचा पगडा सुशिक्षितांच्या मनावर खोल बिंबलेला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
राजकीय नेत्यांकडून महाराजाची बडदास्त
उल्लेखनीय म्हणजे अंधश्रध्दा निमूर्लनासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी प्राणाचा बळी दिला तरी देखील समाजात सुशिक्षित वर्गात किती मोठया प्रमाणात अंधश्रध्दा आणि बुवाबाजी वरील  विश्वास पसरला आहे. याचेच ही घटना उदाहरण आहे. विनायक जाधव महाराज पार्डी सारख्या खेडयात राहत असला तरी त्याचे अधिकतम वास्तव्य मुंबईत असले आणि अनेक राजकीय नेते या महाराजाची मुंबईत बडदास्त ठेवतात डझानावरी भ्रमणध्वनीपासून तर महागडया गाडया उत्तम निवासभोजनव्यवस्था या  नेत्यांकडून केल्या जाते. असे खात्रीलायक समजते.