गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या भुरटय़ा चोऱ्या, गर्दीमुळे होऊ शकणारी चेंगराचेंगरी, देशात सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात राज्य परिवहन महामंडळाने शहरातील बस स्थानकांवर कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. हा विषय सध्या प्राथमिक पातळीवर असून यासाठी आवश्यक निधी, कॅमेऱ्यांची संख्या आदी प्रश्नांची उत्तरे एसटी महामंडळ आणि प्रशासन आपापल्या पातळीवर शोधण्यात मग्न आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेले काम लगेचच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे पुन्हा रेंगाळण्याची शक्यता आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध आस्थापनांनी आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात केली. त्यात राज्य परिवहन मंडळ आघाडीवर असले तरी कामातील संथपणा हा चिंतेचा विषय ठरला आहे. मंडळाने तयार केलेला आराखडा निधीच्या प्रतीक्षेत आहे. ऐन वेळी गोंधळ नको याकरिता मंडळाने पदरमोड करत काही कामे सुरू केली. हे खरे असले तरी, कुंभमेळ्यातील कोणत्याही नियोजनासाठी मंडळाने ‘प्रस्तावित’ हे ठेवणीतील उत्तर तयार ठेवले आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी एसटी मंडळाने ११२५ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र मंडळाच्या खात्यावर निधीच्या नावाने ठणठणाट आहे. पहिल्या टप्प्यात नाशिकरोड आगाराचे काम हाती घेण्यात आले. तसेच सातपूर येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
उर्वरित निधीचा वापर हा महामार्ग बसस्थानकाचे डांबरीकरण, नाशिकरोड रेल्वे स्थानकालगतच्या बस स्थानकाची पुनर्बाधणी, जव्हारफाटा येथील सिंहस्थ शेडचे नूतनीकरण, वाहनतळाचे डांबरीकरण, त्र्यंबकेश्वरच्या जुन्या बसस्थानकाच्या वाहनतळाचे डांबरीकरण, जिल्ह्यात तसेच शहर परिसरात १९ ठिकाणी वाहनतळे विकसित करणे आदी कामे प्रलंबित आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रत्येक स्थानकावरून लाखो भाविकांची वाहतूक केली जाणार आहे. या वेळी प्रवासी अर्थात भाविकांची सुरक्षितता महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. गर्दीचा फायदा उचलून काही असंतुष्ट घटक बसस्थानकांवर लक्ष केंद्रित करू  शकतात. यामुळे शहरातील बस स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
त्याकरिता अंदाजे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, मात्र कोणत्या बसस्थानकांवर ही यंत्रणा बसविली जाईल, त्यांची संख्या किती असेल, त्यांचा नियंत्रण कक्ष याबाबतची स्पष्टता झालेली नाही.
या संदर्भात विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुंभमेळ्या संदर्भातील कागदोपत्री नियोजन पूर्ण असल्याचे सांगून वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे. यामुळे माहिती व नियोजनात बदल होऊ शकतो असे त्यांनी नमूद केले.