गेल्या अनेक वर्षांपासून महिला टपाल कर्मचाऱ्याला गणवेश नसल्याची क्षुल्लक मागणी पोस्ट विभागाकडून पूर्ण न झाल्याने हा पवित्रा घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. नवी मुंबईमध्ये एकूण २५८ पदांवर टपाल कर्मचारी आणि शिपाई काम करतात. २००७ सालापासून आवश्यकता असूनही कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. पाच वर्षांपूर्वीच्या जुनाट पिशव्या घेऊन कर्मचाऱ्याला घरोघरी हिंडावे लागते. ३ वर्षांपासून पदोन्नतीपासून हे कर्मचारी वंचित असल्याने संघटनेने अधीक्षकांकडे लेखी पाठपुरावा केला. मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर पोस्टल एम्प्लॉईज या संघटनेने साखळी उपोषणाचे हत्यार उपसल्याचे अजय जाधव यांनी सांगितले. सकाळी दहा वाजल्यापासून हे संघटनेचे प्रतिनिधी उपोषण करणार आहेत. यावेळी टपाल कर्मचारी त्यांच्या पदावर कार्यरत राहणार आहेत. जनतेची कोठेही गैरसोय होऊ नये यासाठी संघटनेने हा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी सांगितले.