शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अन्य राज्यांतल्या अनेक टोळ्या या कामात सक्रीय झाल्या आहेत. विशेष म्हणजे या टोळ्यांमध्ये सराईत तरुणींचा भरणा आहे. अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला शिपायांनी अशा दोन सराईत सोनसाखळी चोर तरुणींना रंगेहाथ अटक केली आहे.
रविवारी बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन तरुणींनी चोरली. त्या अंधेरी येथील फलाट क्रमांक पाच वर उतरून पळत होत्या. त्यावेळी गस्तीवर असणाऱ्या अंधेरी रेल्वे स्थानकाच्या दोन महिला पोलीस शिपायांनी ते पाहिले. त्यांनी पळणाऱ्या या दोन तरुणींना पकडले. त्यांनी चोरलेली सोनसाखळी त्यांच्याकडे आढळून आली. या दोन्ही तरुणी मूळ राजस्थानच्या असून सध्या वसईत वास्तव्याला होत्या. मुंबईत हाजी अली दर्शनासाठी आल्याची बतावणी त्यांनी केली. या दोन्ही तरुणी सराईत सोनसाखळी चोरणाऱ्या असून त्यांच्यावर यापूर्वीही सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती अंधेरी रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरदत्त यांनी दिली