अंबरनाथ पालिकेचे उपमुख्याधिकारी डॉ. संग्राम नार्वेकर यांनी अचानकपणे पालिकेतील सर्व विभागांना भेटी दिल्या असता अनेक कर्मचारी गैरहजर तसेच कार्यालयीन वेळेत हजर नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे या सर्वाना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, दोषींवर शिस्तभंग तसेच पगारकपातीची कारवाई करण्यात येणार आहे.
कोणतीही सूचना न देता गैरहजर राहणे, कामावर उशिरा येणे, न सांगता कुठेही निघून जाणे अशा प्रकारचे बेशिस्त वर्तन अंबरनाथ पालिकेतील कर्मचारी करत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. यामुळे या तक्रारींची दखल घेत  पालिकेचे उपमुख्याधिकारी डॉ. संग्राम नार्वेकर यांनी शनिवारी सकाळी पालिकेतील सर्व विभागांची झाडाझडती घेतली. या वेळी ४० हून अधिक कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत हजर नसल्याचे तसेच त्यांनी नोंदवहीवर सहीदेखील केली नसल्याची बाब समोर आली. यामुळे पालिकेतील अनेक लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अशा वर्तनाला आळा घालण्यासाठी थम्ब इम्प्रेशन पद्धतीद्वारे त्यांची हजेरी घेण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.