गारव्याचा आनंद घेणाऱ्या नाशिककरांवर मंगळवारी पहाटेपासून बेमोसमी पावसाचा शिडकावा सुरू झाल्यामुळे वातावरणाचा नूर पालटला असून त्याचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकांना बसणार आहे. द्राक्षाची काढणी वेग घेत असताना बेमोसमी पावसामुळे त्यांचा दर्जा व टिकाऊपणा कमी होणार असल्याची धास्ती उत्पादकांना आहे. बेमोसमी पावसाचा शिडकावा आणि ढगाळ वातावरण यामुळे किमान तापमानात पाच अंशांची वाढ झाली आहे. वातावरणातील हे बदल द्राक्ष व गहू पिकांना नुकसानकारक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
सलग सहा ते सात दिवसांपासून गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वातावरणात मंगळवारी अचानक बदल झाले. भल्या पहाटेपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी सकाळपासून बेमोसमी पावसाची रिमझिम सुरू झाली. झोपेतून उठलेल्या अनेकांना तो धक्का होता. एरवी हिवाळ्यात सहसा पाऊस पडत नाही. तथापि, या दिवशी उलट स्थिती होती. पावसाचा रिमझिम शिडकावा अगदी दुपापर्यंत सुरू होता. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांनी त्यापासून बचावासाठी रेनकोट, छत्री व तत्सम साहित्य वापरण्यास प्राधान्य दिले. शहरातील रस्ते ओलसर झाल्यामुळे ठिकठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडले. ढगाळ हवामानामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. सर्वत्र काळोख दाटल्याचे पहावयास मिळाले.
लक्षद्विप ते गुजरात-राजस्थानपर्यंतच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली. मागील पाच ते सहा दिवस नाशिक शहरातील तापमान १० अंशाच्या आसपास स्थिरावले होते. त्यामुळे गुलाबी थंडीची अनुभूती मिळत असताना मंगळवारी तापमानात वाढ झाली. सर्वसाधारपणे पाऊस झाल्यावर तापमान वाढते. ढगाळ वातावरणाचा तो परिणाम असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. सोमवारी ११.२ अंश तापमानाची झालेली नोंद दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी थेट १६ अंशावर गेली. दुपापर्यंत ०.६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली.
बेमोसमी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची अस्वस्थता वाढली आहे. द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला असून थंडीमुळे त्यास फारशी मागणी नसताना हे अस्मानी संकट कोसळल्याची उत्पादकांची भावना आहे. पावसाच्या शिडकाव्यामुळे द्राक्ष घडाला गुंडाळलेले कागद गळून पडले. हे पाणी घडांमध्ये साठून बुरुशी लागण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली. तयार झालेल्या द्राक्षपिकावर विपरित परिणाम होईल. या मालाचा दर्जा घसरून टिकावूपणा कमी होईल, अशी शक्यता उत्पादक नीलेश ताडगे यांनी व्यक्त केली.
द्राक्ष व गव्हाला फटका
बेमोसमी पावसाचा द्राक्ष पिकासह गव्हावर विपरित परिणाम होईल. द्राक्ष पिकांवर रोगाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी उत्पादकांना औषधांची फवारणी करावी लागणार आहे. म्हणजे, त्यांच्या उत्पादन खर्चात अखेरच्या टप्प्यात वाढ होणार आहे. गव्हावर मावा रोगाचा प्राद्र्रुभाव वाढू शकतो. जिरायत पिकांना मात्र हा पाऊस लाभदायक ठरेल.
संदीप मेढे, नाशिक तालुका कृषी अधिकारी