सुमारे पावणे नऊ लाखाचा बनावट धनादेश सातपूरच्या बँक ऑफ इंडिया शाखेत वटवून ही रक्कम उत्तर प्रदेशातील अॅक्सिस बँकेच्या एका शाखेत जमा करुन फसवणूक केल्या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक खात्यात सुरक्षित असणाऱ्या रकमेवर या पध्दतीने डल्ला मारण्याच्या घटनेमुळे एकूणच बँक कर्मचारी व खातेदारांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
१५ ते १६ जानेवारी दरम्यान बँक ऑफ इंडियाच्या सातपूर शाखेत हा प्रकार घडला. उत्तर प्रदेशातील गौडा येथे अॅक्सीस बँकेच्या शाखेतील खातेदार संजयकुमार नावाच्या व्यक्तीने हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयिताने बँक ऑफ इंडियाच्या पणजी शाखेतील खातेदार मे. कासा फार्मा लेबॉरटरीज् यांच्या नावाने ८,८६,३५० रुपयांचा बनावट धनादेश तयार केला. हा धनादेश खरा असल्याचे भासवत तो बँक ऑफ इंडियाच्या सातपूर शाखेतून वटवून ही रक्कम अॅक्सीस बँकेच्या उपरोक्त शाखेत संबंधिताच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर संशयिताने एटीएम यंत्रणेतून दीड लाख रुपये काढले. या माध्यमातून बँकेच्या खातेदाराची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बनावट नावाने धनादेश तयार करून पैसे काढून घेण्याच्या या प्रकारामुळे बँकिंग वर्तुळातही अस्वस्थता पसरली आहे. वास्तविक, बँकेच्या दैनंदिन व्यवहारात एकेका शाखेत शेकडो-हजारोंनी धनादेश येत असतात. बँक कर्मचारी धनादेशावरील आपल्या खातेदाराची स्वाक्षरी पडताळणी करून तो वटवितात. त्यावेळी धनादेश खरा आहे बनावट याची पडताळणी होते की नाही ही बाब अनुत्तरीत आहे. उपरोक्त घटनेत संशयिताने बहुदा याचा लाभ उठवून बेमालुमपणे पैसे काढून घेतले. धनादेशाच्या माध्यमातून होणाऱ्या मोठय़ा व्यवहारांदरम्यान बँकांनीही आवश्यक ती खात्री व पडताळणी करणे गरजेचे असून अन्यथा खात्यातील सुरक्षित रकमेला गळती लागण्याचा धोका आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
बनावट धनादेशाद्वारे पावणे नऊ लाखांची फसवणूक
सुमारे पावणे नऊ लाखाचा बनावट धनादेश सातपूरच्या बँक ऑफ इंडिया शाखेत वटवून ही रक्कम उत्तर प्रदेशातील अॅक्सिस बँकेच्या एका शाखेत जमा करुन फसवणूक
First published on: 29-01-2014 at 09:48 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating with fake cheque worth 9 lakhs