गेली काही वष्रे केंद्राच्या अर्थसंकल्पावरील विश्लेषणपर भाषण करण्याची देवेंद्र फडणवीस यांची परंपरा यंदाही कायम राहणार असून मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ते नागपुरात दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पावरील आपले विचार लोकांसमोर मांडणार आहेत. विरोधी पक्षात असताना सातत्याने अर्थसंकल्पाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारे फडणवीस आपल्याच केंद्र सरकारच्या उणिवा लोकांसमोर मांडतात की केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची पाठराखण करतात, हे नागपूरकरांना बघावयास मिळणार आहेत.
झिरो बजेटची संकल्पना मांडणारे डॉ. श्रीकांत जिचकार यांनी अर्थसंकल्पाचे दरवर्षी विश्लेषण करण्याची व त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पायंडा पाडला. अनेक वष्रे सातत्याने हा उपक्रम आयोजित करीत डॉ. जिचकारांनी अर्थसंकल्पांच्या विश्लेषणाची ही पध्दत नागपुरात रूढ केली होती. त्यांच्या पश्चात, देवेंद्र फडणवीस यांनी ही परंपरा कायम राखली व गेली काही वष्रे ते प्रत्येक केंद्रीय अर्थसंकल्पावर न चुकता विश्लेषणपर भाषण करीत आहेत.
यावर्षी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यावरही फडणवीस या विश्लेषणाची पध्दत कायम राखतात की त्यात खंड पडतो, या बाबत उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: केंद्रात व राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार असताना आपल्याच अर्थसंकल्पावर फडणवीस बोलतील की नाही या बाबत शंका व्यक्त केली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वत: फडणवीस देखील यावेळी हे विश्लेषण करावे की नाही याबाबत संभ्रमात होते. मात्र, नागपुरातील अनेकांनी त्यांनी विश्लेषण कार्यक्रमात खंड न पडू देण्याचा व याही वर्षी अर्थसंकल्पावर भाषण करण्याचा आग्रह धरला. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात पाठपुरावा सुरू होता, मात्र कोणताही निर्णय फडणवीस यांनी अद्याप घेतला नव्हता.
आता अंतिमत: या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असून केंद्राच्या अर्थसंकल्पावर बोलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या होकारानंतर आता कार्यक्रमाची वेळ व दिनांक निश्चित करण्याबाबत प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे नागपूरकरांना या वर्षीदेखील फडणवीसांचे अर्थसंकल्पावरील भाष्य ऐकायला मिळणार आहे. केंद्रात व राज्यात दोन्हीकडे भाजप सरकार असल्याने फडणवीसांच्या विश्लेषणावर काही प्रमाणात मर्यादा येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री कशा प्रकारे करतात, हे बघणेदेखील मनोरंजक राहणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2015 रोजी प्रकाशित
अर्थसंकल्पावरील भाषणाची परंपरा मुख्यमंत्री कायम राखणार
गेली काही वष्रे केंद्राच्या अर्थसंकल्पावरील विश्लेषणपर भाषण करण्याची देवेंद्र फडणवीस यांची परंपरा यंदाही कायम राहणार असून मुख्यमंत्री झाल्यानंतर
First published on: 14-02-2015 at 02:01 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister will continue budget speech tradition