इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सतर्फे संसर्गजन्य आजारांवर बालरोग तज्ज्ञांच्या १५व्या राष्ट्रीय व संस्थेच्या आठव्या परिषदेचे (नॅपकॉन २०१२) आयोजन २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या दोन्ही परिषदांचे आयोजन इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स नागपूर शाखेने केले आहे. हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन २४ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रोहित अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी डॉ. विजय येवले, डॉ. रिताब्रता कुंदू, डॉ. दिगंत शास्त्री, डॉ. अभय शहा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी २३ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजता नॅपकॉन परिषदेला  प्रारंभ होणार आहे. या दिवशी दुपारी ३ वाजता डॉ. डी.जी. गान व्याख्यानमालेत मेंदूच्या विषाणूजन्य आजारांवर डॉ. व्रजेश उदानी यांचे व्याख्यान होणार आहे.
या विषयावर डॉ. सोनू उदानी, डॉ. भावना निखकर, डॉ. सतीश देवपुजारी विचार व्यक्त करणार आहेत.
२४ नोव्हेंबरला डॉ. ए. पार्थसारथी व्याख्यानमालेत डॉ. रोहित अग्रवाल ‘इन्फल्यूएन्झा विषाणूंमुळे लहान मुलांमध्ये होणाऱ्या आजारांवर उपचार व लसीकरण’ या विषयांवर विचार व्यक्त करणार आहेत. २५ नोव्हेंबरला डॉ. पी.आर डांगे व्याख्यानमालेत डॉ. वाय.के. आमदेकर ‘जन्म झालेल्या बाळांना होणारा संसर्गजन्य आजार, उपचार व लसीकरण’ या विषयावर बोलणार आहेत.
 या परिषदेला देशभरातून हजारो प्रतिनिधी येणार आहेत. भारतामध्ये २०११ मध्ये विविध रोगांमुळे १९.८ लाख बालके दगावली आहेत. यात संसर्गजन्य रोगांमुळे दगावलेल्या बालकांची संख्या मोठय़ा प्रमाणात  असल्याचे डॉ. उपाध्ये
यांनी सांगितले. या परिषदेसाठी डॉ. उदय बोधनकर, डॉ. विनोद गांधी, डॉ. संजय मराठे, डॉ. वसंत खळतकर, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ. अनिल राऊत, डॉ. कुलदीप सुखदेवे, डॉ. मोहत हक, डॉ. विराज शिंगाडे आदी संघटनेचे पदाधिकारी सहकार्य करणार आहेत.