नवी मुंबई पालिका क्षेत्र वगळता सिडकोच्या खारघर, कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली या क्षेत्रांत सिडकोने ३२७ सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून आणखी २४७ कॅमेरे येत्या सहा महिन्यांत लावले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी धर्तीवर सिडको खारघर विभाग तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. स्मार्ट सिटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना महत्त्व देण्यात आल्याने सिडकोने केवळ खारघर भागात ५१ ठिकाणी १२८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे सिडकोचे क्षेत्र आता २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली येणार आहे. या कामासाठी सिडको सुमारे साठ कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व अधोरेखित झाले. मात्र मुंबईत सरकारला अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे लावता आलेले नाहीत. मुंबईची जुळी बहीण असलेल्या नवी मुंबई पालिकेने सर्वप्रथम २६२ सीसीटीव्ही कॅमेरे काही मोक्याच्या ठिकाणी लावले आहेत, मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना लागणाऱ्या विजेच्या बिलापोटी हे कॅमेरे मध्यंतरी बंद पडले होते. त्यातील अनेक कॅमेरे आजही बंद आहेत. पामबीच मार्गावर लावण्यात आलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे रहदारीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर काही काळ कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले होते. काही कॅमेरे बंद असल्याने चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्य़ांत पोलिसांना तपास करताना अडचणी येत आहेत.
नवी मुंबई पालिकेनंतर सिडकोने आपल्या क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले आहे. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सिडको क्षेत्राला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी खारघर नोडची निवड केली आहे. त्यामुळे या विभागाने सुचविलेल्या खर्चानुसार हे कॅमेरे लावले जात आहेत. लोकसंख्या आणि सुविधांच्या तुलनेत झपाटय़ाने वाढणाऱ्या खारघर, कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, कामोठे या भागांत सिडको एकूण ५७४ सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. त्यातील ३२७ कॅमेरे लावण्यात आले असून खारघरचा गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, टाटा रुग्णालय या भागांवर या कॅमेऱ्यांची नजर असेल. सकाळ-संध्याकाळ वगळता या भागात फार रहदारी नसते. मध्यंतरी गोल्फ कोर्समध्ये संध्याकाळी तळीरामांच्या मैफली बसत होत्या. हिरवागार असलेला गोल्फ कोर्स काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरल्यानंतर तळीरामांसाठी खुला करून दिला जात होता. या सर्व हालचाली यानंतर टिपल्या जाणार आहेत. सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेट्रो हा याच भागातून जात असल्याने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व वाढले आहे. तळोजा सेंट्रल जेल या नोडला लागून आहे. खारघर नंतर सिडकोचा कामोठे हा भाग वेगाने विकसित होत असल्याने त्या ठिकाणी ३१ जागांवर ६३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून खांदेश्वर-५२, कळंबोली-३८, नवीन पनवेल-२० आणि पनवेल येथे सहा कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी २७४ कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2015 रोजी प्रकाशित
सिडकोवर ३२७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
नवी मुंबई पालिका क्षेत्र वगळता सिडकोच्या खारघर, कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली या क्षेत्रांत सिडकोने ३२७ सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून आणखी २४७ कॅमेरे येत्या सहा महिन्यांत लावले जाणार आहेत.

First published on: 08-08-2015 at 12:07 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco fit 327 cctv camera