पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्याची गरज
चोहोबाजूने डोंगर, मोकळी हवा, विस्तीर्ण असे भौगोलिक क्षेत्र आणि विशेष म्हणजे गर्दीपासून अलिप्त असल्याने गेल्या काही वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांना नागरिकरणाच्या प्रक्रियेत महत्व प्राप्त होऊ लागले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील शहरीकरणाचा केंद्रिबदू ठरत असलेल्या या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नागरी सुविधांचा अभाव जाणवत असल्याने याठिकाणी उभ्या रहात असलेल्या नव्या वस्तीसाठी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे आव्हान यापुढे स्थानिक प्राधिकरणे तसेच राज्य सरकारलाही पेलावे लागणार आहे.  
अंबरनाथ, बदलापूर या दोन नगरांना लागूनच मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुलांची उभारणी होते आहे. बडय़ा बांधकाम उद्योगसमूहांचे गृह प्रकल्प याठिकाणी आकाराला येत आहेत. या संकुलांमध्ये मुबलक प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध असल्याने घरे विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गाव आणि शहर अशा परिघात हा विकास होत आहे. या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये घरे खरेदी करणारा बहुतांशी वर्ग हा मध्यमवर्गीय आहे. साधारणपणे २० टक्के स्थानिक रहिवासी या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. या नवीन प्रकल्पांमुळे या भागात एक नवे शहर उभे रहात असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. पाणी, रस्त्यांसारख्या मुलभूत सुविधा विकासकांकडून येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला आहे. एकीकडे हा विकास होत असताना नव्या वसाहतींमधील वाढती लोकसंख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नागरी सुविधांचा पडणार भार याचाही विचार स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाला करावा लागणार आहे.
या नवीन विकसित क्षेत्रात आजही शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. नवे गृह प्रकल्प उभे रहात असताना या भागातील शेती संपुष्टात येते की काय, अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे. त्यामुळे हा विकास करताना स्थानिकांना विश्वासात घेण्याचे आव्हानही विकासकांना पेलावे लागत आहे. या नवीन गृहनिर्माण प्रकल्पातून लाखो रूपयांचा कर स्थानिक प्रशासनाच्या तिजोरीत पडणार आहे. अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहरांच्या परिसरात चिखलोली, भोज, चिंचोली अशी धरणे आहेत. प्रस्तावित पोशीर धरण ठाणे जिल्ह्य़ाला पाणी पुरवठा करेल एवढय़ा क्षमतेचे आहे. नवीन पाण्याचे स्त्रोत या भागात असल्याने विकासकांनी या भागाला विशेष प्राधान्य दिले आहे. बदलापूर ते नाशिक महामार्गाकडे जाण्यासाठी मुरबाडमार्गे बोगद्यातून रस्त्याचा विचार प्रस्तावित आहे. विकासाचे अनेक प्रस्ताव येथील नगरपालिकांनी मंजूर केले आहेत, अशी माहिती या भागातील नेते राम पातकर यांनी दिली.  
अंबरनाथ, बदलापूर परिसरात औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींपासून दूर अंतरावर गृहप्रकल्प उभारावेत याचे भान ठेऊन विकासकांना गृहप्रकल्प उभारावे लागणार आहेत. डोंबिवली एमआयडीसी परिसरात निवासी आणि औद्योगिक वसाहतींमध्ये एकप्रकारचा संघर्ष सुरू आहे. असा संघर्ष या भागात उभा राहू नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
शहरापासून दूरवर राहत असलेल्या रहिवाशांना विकासकाने उपलब्ध करून दिलेल्या वाहन व्यवस्थेवर किंवा रिक्षा, खासगी वाहनांवरच रहिवाशांना रेल्वे स्टेशन, बाजारपेठेपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. स्थानिक पालिकांच्या परिवहन सेवा नसल्याने रेल्वे स्टेशन ते घरापर्यंत जाण्यासाठी या मंडळींना रिक्षा, खासगी वाहनांवरच अवलंबून राहणार आहे. लगतच्या वाढत्या लोकवस्तीमुळे शहरातील रस्ते, वाहनतळ यावर आपोआप ताण येणार आहे. याचा सर्वांगिण विचार करून नगरपालिका प्रशासनाने आतापासून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगण्यात येते.