खटल्याशी संबंधित कागदपत्रांची प्रत देण्यासाठी ५० रूपयांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा न्यायालयातील महिला लिपिकाला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. लाचखोरीचे लोण थेट न्यायालयापर्यंत पोहोचल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शिरपूर तालुक्यातील माळीवाडा येथील चंद्रकांत बडगुजर यांचे वडील यादव बडगुजर आणि थोरले बंधू विनायक बडगुजर यांच्यात शेत जमिनीवरील वाद सुरू आहे. न्यायालयात हे प्रकरण गेले असून या खटल्याविषयीच्या कागदपत्रांची प्रत मिळावी म्हणून २७ जानेवारी रोजी चंद्रकांत बडगुजर यांनी शासकीय रकमेचा भरणा करून लेखा शाखेत अर्ज सादर केला. महिला लिपिक एम. बी. नेरकर यांची भेट घेत कागदपत्रे लवकरात लवकर मिळावी म्हणून त्यांना विनवले. नेरकर यांनी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी बडगुजर यांच्याकडे १०० रुपये मागितले. त्यामुळे संतप्त झालेल्या बडगुजर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. न्यायालय आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तडजोडीअंती ५० रूपये बडगुजर यांच्याकडून नेरकर या स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये लाचखोरी वाढत असल्याने एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक होणे ही नागरिकांच्या दृष्टिने नेहमीची बाब झाली आहे. परंतु न्यायालयाशी संबंधित महिलेने लाच घेण्याची घटना सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ठरली आहे.