* चिमूर तालुक्यातील बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत मृतदेह
* ग्राम पंचायत सदस्याला अटक
* अमरपुरी व खडसंगीत कडकडीत बंद
भंडारा येथील तीन बहिणींच्या हत्याकांडाचे प्रकरण चर्चेत असतांनाच बेपत्ता मुलीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणारे चिमूरचे ठाणेदार पंजाबराव मडावी यांचे निलंबिन होत नाही तोवर मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका मृत मुलीच्या कुटुंबीयांनी घेतल्याने अमरपुरी (भान्सुली) येथे तणावाचे वातावरण होते. उपविभागीय पोलीस अधिकारी होळकर यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आज दुपारी मुलीचा दफनविधी पार पडला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे अमरपुरी व खडसंगी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
चिमूर तालुक्यातील अमरपुरी येथील बारावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह काल रविवारी दुपारी गावातील विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. आश्रमशाळेत शिकणारी ही मुलगी घरी परत आली होती. गुरुवारी ग्राम पंचायत सदस्य सुनील बाळकुष्ण चौखे याने बलात्कार केल्याने मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. शनिवार सकाळी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र ठाणेदार पंजाबराव मडावी यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. यानंतर रविवारी दुपारी एक वाजता गावातील विहिरीतच मुलीचा मृतदेह सापडला. ग्राम पंचायत सदस्य चौखे याला मुलीवर बळजबरी करतांना आजी व आईने बघितले होते. त्यामुळे गावकरी व कुटुंबीयांनी चौखे यांना अटक करण्याची मागणी लावून धरली होती. आरोपीच्या अटकेसाठी शेकडो गावकरी पोलीस ठाण्यावर चालून आल्यानंतर चौखे याला अटक करण्यात आली. त्यामुळे काल रविवारी गावात तणावाचे वातावरण होते.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीराम तोडासे पोलिसांचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुलीचे शवविच्छेदन चंद्रपूरला जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्री दोन वाजता चंद्रपूरच्या रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी धोटे, डॉ. हजारे, डॉ.रामटेके, डॉ. मुरकरवार, डॉ.श्रीरामे, डॉ. आनंद किन्नाके सहा डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. यानंतर रात्रीच मृतदेह अमरपुरी येथे आणण्यात आला, मात्र तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे ठाणेदार पंजाब मडावी यांना निलंबित करणार नाही तोवर मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने आज पुन्हा गावात तणावाची स्थिती होती. उपविभागीय पोलीस अधिकारी होळकर यांनी मुलीच्या वडिलांची समजूत काढून कारवाईचे आश्वासन दिले, तसेच शवविच्छेदन अहवालही कुटुंबीयांना दाखविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण आत्महत्या दाखविण्यात आले आहे. यावर कुटुंबीयांनी चौखे यांच्या दबावाला बळी पडूनच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप केला.
मृतदेह उचलणार नाही तोपर्यंत स्थिती सामान्य होणार नाही, हे लक्षात येताच दोषीवर सक्त कारवाई करण्याचे मान्य केल्यानंतर दुपारी दोन वाजता दफनविधी कसाबसा उरकण्यात आला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, या घटनेमुळे अमरपुरी व खडसंगी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दफनविधी आटोपताच गावातील तणाव हळूहळू निवळायला सुरुवात झाली आहे, मात्र अशाही परिस्थितीत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
.. आणि मुलीचे वडील ट्रकच्या दिशेने धावले
चिमूर येथील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चंद्रपूरला शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला होता. पोलीस सहकार्य करत नसल्याचे बघून मुलीचे पार्थिव रुग्णवाहिकेतून कडक पोलीस बंदोबस्तात चंद्रपूरला आणत असतांना मुलीचे वडील लघुशंका करण्याच्या उद्देशातून गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांचे थोडे दुर्लक्ष झाल्याचे बघून ते ट्रकच्या दिशेने धावत सुटले. चालकाच्या प्रसंगावधानाने ट्रक जागेवर थांबल्याने मोठा अनर्थ टळला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2013 रोजी प्रकाशित
ठाणेदाराला निलंबित करण्याच्या मागणीने तणाव
* चिमूर तालुक्यातील बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत मृतदेह * ग्राम पंचायत सदस्याला अटक * अमरपुरी व खडसंगीत कडकडीत बंद भंडारा येथील तीन बहिणींच्या हत्याकांडाचे प्रकरण चर्चेत असतांनाच बेपत्ता मुलीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणारे चिमूरचे ठाणेदार पंजाबराव मडावी यांचे निलंबिन होत नाही तोवर मृतदेह उचलणार नाही,
First published on: 05-03-2013 at 03:36 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict for suspension of police inspector