निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वेगवेगळे गट सक्रिय
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे पक्ष निरीक्षक गेव्ह आवारी यांच्यासमोर मंगळवारी चंद्रपुरातील विश्रामगृहावर माजी खासदार नरेश पुगलिया गटाने, तर वरोरा येथे पालकमंत्री संजय देवतळे व आमदार विजय वडेट्टीवार गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पुगलिया गटाने विदर्भ राज्य निर्मितीची मागणी निरीक्षकांकडे लावून धरली.
आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता पक्ष निरीक्षक गेव्ह आवारी यांनी मंगळवारी जिल्ह्य़ात येऊन काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आवारी यांचे स्थानिक विश्रामगृहावर आगमन होताच ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया गटाच्या वतीने महापौर संगीता अमृतकर, युवानेते राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गटनेते सतीश वारजूकर, पालिका गटनेते संतोष लहामगे, बल्लारपूरच्या नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह आवारी यांची भेट घेऊन या जिल्ह्य़ात भाजप-शिवसेना युतीला पराभूत करायचे असेल तर माजी खासदार पुगलिया यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी लावून धरली. या जिल्ह्य़ात पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर महापालिका व बल्लारपूर नगर पालिकेत कॉंग्रेसची सत्ता आहे. पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्य़ात कॉंग्रेस बहरल्याचे सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी पुगलिया यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. यावेळी पुगलिया गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आवारी यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले, तसेच स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसोबतच आता स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंग व उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी करावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली. या मागणीचे निवेदन आवारी यांना देण्यात आले. याप्रसंगी आवारी यांनी युवक कॉंग्रेस लोकसभा अध्यक्ष, तसेच शहर अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सेवादल अध्यक्ष, महिला कॉंग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
वरोरा विश्रामगृहावर पालकमंत्री संजय देवतळे, आमदार विजय वडेट्टीवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गेव्ह आवारी यांची भेट घेतली. आवारी यांचे वरोरा येथे आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. देवतळे-वडेट्टीवार गटाकडून जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. विजय देवतळे, डॉ.आसावरी देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, आबीद अली, महिला अध्यक्ष नंदा अल्लूरवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आवारी यांची भेट घेतली. यावेळी देवतळे व वडेट्टीवार या दोन्ही नेत्यांची नावे लोकसभेसाठी समोर करण्यात आली. लोकसभेत कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर नव्या दमाचा उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली. नवीन व युवा चेहरा दिला तर या जिल्ह्य़ात काँग्रेसला कुणीही पराभूत करू शकणार नाही, असे मत देवतळे व वडेट्टीवार यांच्या कार्यकर्त्यांनी मांडले. येथेही आवारी यांनी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. एकूणच पक्ष निरीक्षकांसमोर पुगलिया व देवतळे-वडेट्टीवार गटाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दोन्ही गटांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश व पक्षश्रेष्ठींना सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचे आवारी यांनी सांगितले. एकूणच लोकसभा निवडणूक बघता चंद्रपूर जिल्ह्य़ात काँग्रेसचे दोन्ही गट सक्रिय झाल्याचे दिसत आहे.