लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणावर पडझडीला सुरुवात झाली असून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका लक्षात घेऊन या नगरसेवकांची पावले भाजप-शिवसेनेच्या दिशेने पडू लागल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सद्य:स्थितीत पक्षांतर बंदीची कु ऱ्हाड कोसळू नये यासाठी ११ नगरसेवकांच्या गटाला स्वतंत्र विकास आघाडीचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील काँग्रेसच्या एकूण १५ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवकांनी बुधवारी महापौरांना सभागृहात वेगळी आसन व्यवस्था करण्याची मागणी केली. महापौर कल्याणी पाटील यांनी तातडीने ही मागणी मान्य केल्याने काँग्रेसचे फुटीच्या उंबरठय़ावर असलेले नगरसेवक  सभागृहात भाजप नगरसेवक बसत असलेल्या बाकडय़ांच्या मागील बाकावर बसले. महापालिकेत वेगळा गट स्थापन करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे कायदेशीर मार्गाने मागणी करण्यात येणार आहे, असे नगरसेवक नवीन सिंग यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत काँग्रेसचे एकूण १५ नगरसेवक आहेत. त्यामधील ११ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याने काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमधील एकाच नगरसेवकाला पक्षातील सर्व मानाची पदे मागील काही वर्षांपासून देण्यात येत असल्याने अन्य नगरसेवक, कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्याचा निषेध म्हणून ११ नगरसेवकांनी आपण वेगळा गट स्थापन करीत असल्याचे म्हटले आहे. याच नगरसेवकांनी गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे पाठवले होते. राज्यात काँग्रेसचा कुणीही मुख्यमंत्री असो, सतत त्यांच्या मागेपुढे राहण्यात वाकबगार मानल्या जाणाऱ्या पक्षाच्या कल्याणमधील एका नेत्याच्या कार्यपद्धतीविषयी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या नेत्याच्या आशीर्वादामुळे महापालिकेतील एकाच पदाधिकाऱ्याला पदे मिळतात, असा इतर नगरसेवकांचा आक्षेप आहे. कल्याण काँग्रेसचे गटनेते म्हणून सचिन पोटे काम पाहतात. यापूर्वी त्यांनी जिल्हाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, युवक अध्यक्ष आदी पदे उपभोगली आहेत. पोटे यांनाच सातत्याने पदे देण्यात येत असल्याने नाराज नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे.
पक्षांतराच्या हालचाली
नगरसेवक नवीन सिंग, जितेंद्र भोईर, शिल्पा शेलार, हृदयनाथ भोईर, शर्मिला पंडित, सदाशिव शेलार, नंदू म्हात्रे, वंदना गीध, भरत पाटील, साबीर कुरेशी, उदय रसाळ यांनी वेगळा गट स्थापन करण्याचे पत्र महापौर कल्याणी पाटील यांना दिले आहे. याच नगरसेवकांनी गेल्या महिन्यात सामूहिक राजीनामे दिले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची तंबी प्रदेशाध्यक्षांनी दिल्याने ते शांत झाले होते. वेगळा गट स्थापन केलेले काँग्रेसचे काही नगरसेवक येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता भाजप, शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फुटीच्या उंबरठय़ावर असलेले काही नगरसेवक ‘आम्हाला आमच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करावाच लागेल’ असे सांगतात. पण कोणत्या पक्षात जाणार याविषयी ते काहीही बोलण्यास तयार नाहीत. यापैकी काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून बदलत्या राजकीय घडामोडींकडे शिवसेनेचे स्थानिक नेते लक्ष ठेवून आहेत. बहुतांशी नगरसेवक अन्य पक्षांत जाण्यापेक्षा आपल्या ताकदीवर कल्याण डोंबिवली विकास आघाडी स्थापन करू अशा विचाराचे आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्ष हा महासागर असून कुणीही पक्षांतर केले तरी त्याचा पक्षाला फारसा फटका बसणार नाही, असा दावा काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते सचिन पोटे यांनी केला.