मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या होमपीचवर काँग्रेसप्रणीत आघाडय़ांची नामुष्कीजनक पराभवांची मालिका खंडित झाली आहे. बहुचर्चित मलकापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी समर्थक पॅनेलला दिलेला हाताचा पंजा हे चिन्ह सर्वच्या सर्व १७ जागा सरासरी ६१ टक्के मतदान घेत ९२० अशा भरघोस मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देदीप्यमान निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. विजयी उमेदवारांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या निकालाने मुख्यमंत्र्यांच्या गटाला नामी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
मलकापूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे सर्व सतराही उमेदवार ६१ टक्के मते घेऊन सरासरी ९२० मताधिक्याने विजयी झाले आहेत. विरोधी यशवंत विकास आघाडीच्या उमेदवारांना सरासरी ३४ टक्के, तर मनसेच्या ५ उमेदवारांसह ३ अपक्षांना ५ टक्के मते मिळाली आहेत. त्यातील विद्यमान नगरसेवक व मनसेचे उमेदवार दादासाहेब शिंगण वगळता उर्वरित सातही उमेदवारांना आपली अनामत रक्कमही गमवावी लागली आहे. सत्ताधारी व विजयी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असे गटनेते व विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर भास्करराव शिंदे, उमा प्रमोद शिंदे, यमुना बाळासाहेब घाडगे, गजेंद्र लक्ष्मण बुधावले, नूरजहाँ अमीरखान मुल्ला, हणमंत निवृत्ती जाधव, सुनीता राहुल पोळ, वनिता चंद्रकांत लाखे, विद्यमान नगराध्यक्ष शारदा दिलीप खिलारे, ज्येष्ठ नगरसेवक शंकर धोंडिराम चांदे, कल्पना नारायण रैनाक, लक्ष्मण नाना येडगे, सुनंदा तानाजी साठे, प्रकाश पांडुरंग बागल, राजेंद्र प्रल्हाद यादव, रत्नमाला पांडुरंग काळे व नयना राजन वेळापुरे हे उमेदवार सहाशे ते साडेचौदाशे मताधिक्याने विजयी झाले. तर मोहनराव रामचंद्र शिंदे, माजी सरपंच संजय मारुती जिरंगे, सुहास राजाराम कदम, शीतल संजय थोरात व अंकुश रामचंद्र जगदाळे या विरोधी यशवंत विकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांसह सर्वच्या सर्व १७ उमेदवारांना दारुण पराभव स्वीकारावा लागला.
हातची सत्ता आणि पक्षाच्या ताकदीबरोबरच काँग्रेसने स्थानिक गटातटांचे मिळवलेले बळ फळास गेले आहे. मलकापूरचे विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे सर्वाधिक २,६३४ मते, तर १,४३३ असे नंबर एकचे मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजयाचे खऱ्या अर्थाने मानकरी ठरले आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेल्या कराड नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह स्थानिक निवडणुकात काँग्रेसप्रणीत आघाडय़ांचा धुव्वा उडाला होता. या निवडणुकांत मुख्यमंत्र्यांचा गड उपमुख्यमंत्री अजित पवारांना मानणाऱ्या नेतेमंडळींनी लीलया सर केल्याचे स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात एकीकडे सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली अन् दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे पाटण तालुक्याचे नेते हिंदुराव पाटील यांच्या गटाचा त्यांच्याच स्वत:च्या मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीत तब्बल २५ वर्षांनी नामुष्कीजनक पराभव झाला. सत्तांतराची ही जादू राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र पाटील यांनी करून दाखवली होती. हा निकाल गांभीर्याने घेऊन लगेचच जाहीर झालेल्या मलकापूरच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा गट मात्र पुरता सावध झाला. मलकापूर नगरपंचायतीसाठी काँग्रेसचेच ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या समर्थकांनी नारळ चिन्हावर यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून थेट काँग्रेसच्या हाताच्या चिन्हालाच आव्हान दिले. परिणामी मलकापूर नगरपंचायतीची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक प्रतिष्ठेची होत नेतेमंडळींसाठी संवेदनशील बनली, मात्र हाताच्या चिन्हामुळे उंडाळकरांची अडचण होऊन त्यांना उघड कोणतीही भूमिका घेता आली नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या आघाडीच्या हाती सत्तेच्या सर्वच चाव्या राहताना, येनकेण कारणाने अपेक्षित व अनपेक्षित नेतेमंडळींचा पाठिंबा मिळून गेला आणि मलकापुरात काँग्रेसची सत्ता आज हाताच्या पंजाच्या तिरंगी झेंडय़ासह डामडौलात पुन्हा उभी राहिली आहे.
या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती सत्त्वशीला चव्हाण, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या सहभागात जंगी सभा पार पडल्या. तर या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे सत्तेचे सर्वेसर्वा मनोहर शिंदे यांनी १७ विरुद्ध शून्य अशा ऐतिहासिक निकालाच्या दिलेल्या हाकेला मलकापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला, तर ड्रायव्हर किंवा भांडी घासणाऱ्या महिलेला फक्त काँग्रेस पक्षच उमेदवारी देऊन विकास साधू शकतो हा शिंदेंनी दिलेला ठाम विश्वास फलश्रुतीस गेला आहे. निवडणुकीत कालचे सर्वच शत्रू आजचे तुझ्या गळा, माझ्या गळा झाल्याने उद्याची राजकीय गणिते काय? आणि काँग्रेसने सत्ता मिळवताना नेमके काही गमावाले का याचाही गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढणार असल्याचे गृहीत धरले जात आहे, मात्र येथून ते लढले नाहीत, तर कालचे राष्ट्रवादीचे नेते आणि आजचे काँग्रेसचे युवानेते डॉ. अतुल भोसले यांच्या पाठोपाठ जुने जाणते आनंदराव पाटील हेही इच्छुक राहतील, मात्र मलकापूरच्या गुलालाबरोबरच मनोहर शिंदे यांचेही नाव विधानसभेसाठी न्याय असल्याची चर्चा जाणकारांमध्ये रंगू लागली आहे.