जेएनपीटी बंदरावर उद्योगातील मालाची ने-आण करणाऱ्या कंटेनरचालकांना राहण्याची, खाण्याची तसेच अंघोळीची सोय नसल्याने अनेक ठिकाणी वाहनचालकांना उघडय़ावर सर्व विधी करावे असल्याने या परिसरातील हजारो कंटेनरचालकांच्या वतीने आवश्यक सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे.   जेएनपीटी बंदर परिसरात १८ जानेवारीला असुविधांनी त्रस्त कंटेनर वाहनचालकांनी जाळपोळ करीत पोलीस वाहन जाळल्याचा प्रकार केला होता. हाच प्रकार भविष्यातही घडू शकतो, अशी भीती येथे व्यक्त करण्यात येत आहे.
जेएनपीटी परिसरातील खासगी तसेच जेएनपीटी बंदरातील कंटेनर हाताळणीसंदर्भात घडणाऱ्या घटनांचा परिणाम येथील स्थानिक नागरिकांवरही होत आहे. बंदरात जड कंटेनर वाहने जात नसल्याने ती कित्येक दिवस रस्त्यावरच उभी राहत असल्याने एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. दररोज दहा ते बारा हजार कंटेनर येथे ये-जा करीत असतात. काही वेळा चालकांना कंटेनरसह रस्त्यातच राहावे लागत असल्याने सुविधांअभावी परिसरातच चालक रस्त्यावर सकाळी प्रातर्विधी, उघडय़ावर अंघोळी करीत असतात. त्यामुळे रस्त्यातील प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी जेएनपीटी व सिडकोने पुढाकार घेऊन सर्व सुविधांनी युक्त अशी वाहनतळे उभारावीत, अशी मागणी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केली आहे.