तलावातून उपसलेल्या गाळासाठी रॉयल्टी न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर घेतला आहे. यामुळे गाळ काढण्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून येणाऱ्या काळातही हे काम सातत्याने व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
चिखली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वायझळी तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यात येत आहे. या कामाची पाहणी करतांना पवार यांनी निर्देश दिले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार राहुल बोंद्रे, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सोपान साठे यावेळी उपस्थित होते. बुलढाणा जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पवार आज जिल्हा दौऱ्यावर आले होते.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली येथील चारा छावणीला भेट देऊन दुष्काळामुळे बाधित फळबागेची पाहणी केली. त्यानंतर चिखलीनजिकच्या वायझळी धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली.
धरणातील गाळ काढून नेणाऱ्या शेतकऱ्यांकडून रॉयल्टी घेऊ नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गाळ घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांसोबत यावेळी चर्चा केली. जिल्हाधिकारी कुरूंदकर आणि तहसीलदार सुरेश बगळे यांनी त्यांना गाळ काढण्याच्या मोहिमेची माहिती दिली. यानंतर त्यांनी चिखली तालुक्यातील हातणी येथे राबविण्यात येत असलेल्या आधारित जलसंजीवनी प्रकल्पाची पाहणी केली.
दाताळा भारनियमन मुक्त होणार
मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील शंभर टक्के वसुली असूनही भारनियमन करण्यात येते. त्यावर कार्यवाही करून त्वरित दाताळा उपकें द्र व त्यावरील गावे भारनियमनमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येथे निवेदनकर्त्यांना दिले.दाताळा उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा व त्यावरील बिलांची शंभर टक्के वसुली असतांनाही सहा-सहा तासांचे भारनियमन करण्यात येते. याविरुध्द अ‍ॅड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा, आंदोलने, तोडफोड, उपोषणे करण्यात आली तरीही वीजवितरण कंपनीने त्यावर तोडगा थातुरमातूर काढला व पुन्हा भारनियमन सुरू केले. याबाबत अजितदादा पवार यांना बुलढाणा येथे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोषराव रायपूरे, पत्रकार गजानन ठोसर, शिरीष डोरले, राहुल जाधव, मंगलसिंह राजपूत, विलास खर्चे, मोहन पाटील, अनंता  वले, गजानन सोनवणे, संजय जाधव, सुरेश काचकुटे आदींनी दाताळाबाबत निवेदन सादर केले होते.