पनवेल तालुक्यातील नव्याने विकसित होणाऱ्या करंजाडे नोडवर एका तरुण कंत्राटदाराला जबर मारहाण करण्याची घटना घडली. या परिसरात नवीन बांधकाम होत असलेल्या इमारतींच्या वीज कंत्राटदारांच्या ठेक्यातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. मारहाण झालेल्या कंत्राटदाराचे नाव किशोर बाबरे असे आहे.
करंजाडे येथे राहणारा किशोर बाबरे याची दिया इलेक्ट्रिकल कंपनी वीज मीटर जोडणीचे काम करते. करंजाडे नोड येथील अंश व सत्यम या इमारतींमधील २०४ सदनिकांना विजमीटर जोडणीचे काम देण्यासाठी प्रति वीजमीटर १६ हजार रुपये एवढय़ा दरामध्ये करण्याचा ठेका त्याला देण्यात आला होता. याच कामासाठी साबळे गटाकडून प्रति वीजमीटर २५ हजार रुपये या दराने हा ठेका मिळविण्यासाठी प्रयत्न झाले होते. हा ठेका हातचा गेल्यामुळे ही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. किशोर याला मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जुन्या तहसील कचेरीशेजारील रस्त्यावर पाच गुंडांनी सर्वादेखत लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली. त्यांतर हे गुंड तेथून पसार झाले. या जबर हल्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी कोणासही अटक करण्यात आलेली नाही. मुख्य बाजारपेठेत किशोर यांच्यावर झालेल्या मारहाणीवेळी पाऊस पडत असल्याने व व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा न लावल्यामुळे या घटनेचा कोणताही क्षण सीसीटीव्ही फुटेजमध्ये टिपलेला नाही.
आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत मारेकऱ्यांना २४ तासांत न अटक केल्यास रोषाला पोलिसांना जावे लागेल असा इशारा दिला आहे. करंजाडे नोडमधील नवीन होणाऱ्या बांधकामासाठी लागणाऱ्या रेती, विटा यांचा पुरवठय़ाचा ठेका एकाच गटाकडे असावा यासाठी दोन गटांत यापूर्वीच टोळीयुद्ध झाले आहे. त्यातूनच साबळे व कैकाडी गटांच्या हाणामाऱ्यातून हत्या झाल्या आहेत. याच टोळी युद्धाचा एक भाग म्हणून करंजाडे येथील नवीन इमारतींमध्ये नवीन वीज जोडणी घेण्याचा ठेका गावातील साबळे गटाकडे असल्याने हा वाद झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोर बाबरे मारहाण प्रकरणातील खऱ्या मारेकऱ्यांची नावे किशोर यांनी दिल्यास पोलिसांच्या तपासाला गती येईल. त्यामुळे भविष्यात यामागचे सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहचू शकतील. पनवेलमध्ये गुंडगिरी करणाऱ्यांना व शांतताभंग करणाऱ्यांना याआधीच तडीपार केल आहे. करंजाडे येथील वीज कंत्राटदारांच्या ठेक्यातून किशोर यांच्यावर हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. स्थानिक गुंडगिरीच्या विरोधात एकही तक्रार विकासक किंवा सामान्य व्यक्तींने दिल्यास संबंधित गुंडशाहीला मोडून काढण्यात येईल. 
– शेषराव सूर्यवंशी, सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई परिमंडळ २  

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contractor assaulted badly
First published on: 25-06-2015 at 12:34 IST