ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा, कळवा तसेच मुंब्रा या प्रभाग समित्यांच्या हद्दीमध्ये विना परवाना जागेचा वापर करणाऱ्यांकडून तात्पुरता ताबा पावतीनुसार वसुली करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या ठेकेदाराने वसुलीची रक्कम महापालिकेस दिलेली नाही, त्यामुळे या ठेकेदाराने भरलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात यावी तसेच त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार करून येत्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आणला आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील नौपाडा, कळवा, मुंब्रा तसेच माजिवाडा-मानपाडा या प्रभाग समितीच्या हद्दीत  विना परवाना जागेचा वापर करणाऱ्यांकडून तात्पुरता ताबा पावतीमार्फत वसुली करण्यात येते. दरम्यान, नौपाडा, कळवा तसेच मुंब्रा या प्रभाग समित्यांच्या हद्दीमध्ये तात्पुरता ताबा पावतीची वसुली करण्याचा ठेका ३ ऑगस्ट २०११ मध्ये मे. सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला देण्यात आला होता. त्यानुसार,
 या संस्थेच्या ठेकेदाराने कामालाही सुरुवात केली होती. मात्र, नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील ठाणे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याने फेरीवाल्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे तात्पुरता ताबा पावतीची वसुली कमी झाल्याने संस्थेला अर्थिक नुकसान होऊ लागले.
 त्यामुळे ठेकेदाराच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील ठेका रद्द करून त्यास ७ लाख ८१ हजार रूपये इतकी वसुलीची थकीत रक्कम भरण्यास सांगितले.
 या संदर्भात ठेकेदाराने न्यायालयात दावा दाखल केला असून त्याने अद्याप थकीत रक्कम भरलेली नाही. तसेच या ठेकेदाराने कळवा, मुंब्रा या प्रभाग समित्यांमधील तात्पुरता ताबा पावती वसुलीचे काम ५ ऑगस्ट २०११ पासून सुरू केले होते.  त्यानुसार मासिक रक्कमेचे धनादेश त्याने महापालिकेला दिले होते. मात्र, ठेकेदाराच्या बँकेतील खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याने त्याने दिलेले २६ पैकी दहा धनादेश वटलेच नाहीत. त्यामुळे २६ लाख ९६ हजार ६७२  इतकी रक्कम महापालिकेच्या निधीत जमा झालेली नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून  त्यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे.
दरम्यान, महापालिकेची फसवणूक केल्यामुळे कळवा तसेच मुंब्रा या प्रभाग समित्यांच्या हद्दीतील तात्पुरता ताबा पावती वसुलीचा ठेका महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे.
या ठेकेदाराकडून नौपाडा, कळवा तसेच मुंब्रा या प्रभाग समितीच्या ठेक्यापोटी ४५ लाख ५२ हजार २०१ रुपये इतकी रक्कम महापालिकेला येणे बाकी आहे. तसेच या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली असून आता स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.