पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या मुलुंड येथील जलाराम बाप्पा मंडईमधील गाळेवाटपाला ग्रहण लागले आहे. प्रशासनाने गाळेवाटपाचे काम अचानक बंद केल्यामुळे गाळेधारक पालिका कार्यालयातच उपोषणाला बसले. अखेर याबाबत लवकरच बैठक घेऊन गाळेवाटपाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने सोमवारी मध्यरात्री दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
पालिकेच्या १८ मंडयांच्या पुनर्विकासाला परवानगी देण्यात आली होती. मुलुंड येथील जलाराम बाप्पा मंडईचा पुनर्विकास पूर्ण होऊन देखणी इमारत उभी राहिली. मात्र काही समाजकंटकांकडून गाळेवाटपामध्ये अडथळे निर्माण करण्यात आल्याने अद्याप गाळ्यांचे वितरण होऊ शकलेले नाही. दादर येथील बाजार विभागाच्या कार्यालयात सोमवारी या मंडईमधील गाळे वाटपाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु पालिकेने अचानक गाळे वाटपाचे काम बंद केले. त्यामुळे गाळेधारक संतप्त झाले आणि त्यांनी तेथेच उपोषण सुरू केले. जोपर्यंत गाळे वाटप होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चौरे आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र भोसले यांनी रात्री ११ च्या सुमारास बाजार विभागाच्या कार्यालयात धाव घेतली आणि उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही गाळेधारक ऐकण्यास तयार नव्हते. अखेरीस येत्या तीन दिवसांमध्ये बैठक घेऊन हा प्रश्न धसास लावण्याचे आश्वासन चौरे आणि भोसले यांनी दिल्यानंतर गाळेधारकांनी आंदोलन मागे घेतले.