कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडीवरील उद्यानासाठी आरक्षित भूखंडाचा सव्वा दोन लाख फुटाचा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) पालिकेच्या नगररचना विभागाने एका विकासकला टीडीआरचे सर्व नियम, कायदे झुगारून दिला आहे. या विकासकाला देण्यात आलेला अर्धा टीडीआर रद्द करून उर्वरित टिडीआर देण्याचे बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिमा जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे केल्याने खळबळ उडाली आहे.
बाजारभावाप्रमाणे या टीडीआरची किंमत सुमारे अठरा कोटी रूपये आहे. एवढा मोठा व्यवहार हा आयुक्तांच्या अपरोक्ष होऊच शकत नाही. त्यामुळे आयुक्तांनी या टीडीआर प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी नगरसेविका जाधव यांनी केली आहे. नेतिवली टेकडीवर उद्यानासाठी आरक्षण क्रमांक ४९२, ५०६ आहे. विकासकाला टीडीआर देताना त्या जागेला संरक्षक भिंत, सातबारा उतारा पालिकेच्या नावावर करून देणे, शासकीय कागदपत्रांची पडताळणी करून टीडीआर देणे आवश्यक असते. परंतु, या जागेच्या टीडीआर देताना महापालिकेच्या नगररचना विभागाने सर्व नियम पायदळी तुडविले आहेत, असा आरोप जाधव यांनी केला. या भुखंडावर काही ठिकाणी अनधिकृत झोपडय़ा, लहान कंपन्या आहेत. असे असताना या जागेचा टीडीआर कोणत्या नियमान्वये विकासकाला देण्यात आला, असे प्रश्न नगरसेविक जाधव यांनी केले आहेत.