वाचनालय तपासणीचा अहवाल योग्य पद्धतीने देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील निरीक्षकास लाचलुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मुर्ढव (तालुका रेणापूर) येथील प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाची तपासणी करून अहवाल देण्यासाठी न्यास नोंदणी कार्यालयातील निरीक्षक आबासाहेब रघुनाथ राठोड याने ग्रंथपालाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. पकी १५ हजार रुपये पूर्वी घेतले. उर्वरित ३५ हजार रुपयांपकी १० हजार रुपये घेताना बुधवारी दुपारी त्यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. विभागाचे पोलीस अधीक्षक एन. व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एन. जी. अंकुशकर, निरीक्षक अभिमन्यू साळुंके आदींच्या पथकाने ही कारवाई केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.