बऱ्याच भवती न् भवतीनंतर अखेर क्रेडाईने शहरातील निवडक ४२ वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाच्या मांडलेल्या विषयावर  महापालिकेने शिक्कामोर्तब केले. यावेळी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने या विषयात महापालिकेने आजवर दाखविलेल्या अनास्थेचा पाढा वाचून आपली संतप्त भावना प्रगट केली.
महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत वाहतूक बेटांच्या विषयावर क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणासाठी क्रेडाईने पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळाले नसल्याची खंत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या बैठकीसाठी मंगळवारचा मुहूर्त लाभला. महापालिका वाहतूक बेट किंवा शहर सुशोभिकरणाबाबत कशा पध्दतीने टोलवाटोलवी झाली, असहकार केला गेला याचे दाखले देण्यात आले. या विषयावर अनेकदा बैठक बोलावूनही महापालिकेचे कोणी उपस्थित राहिले नाही. यामुळे सहा महिन्यांपासून हा विषय रेंगाळला असल्याचे क्रेडाईने निदर्शनास आणून दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, केड्राई, औद्योगिक वसाहतीतील काही संस्था तसेच सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने वाहतूक बेट सुशोभीकरणाचे काम करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे अशी अपेक्षा क्रेडाईचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी व्यक्त केली.
वाहतूक बेटाबाबत काही करार करण्यासाठी, महापालिका वा इतर विभागाशी चर्चा करताना अडवणूक केली जाते, तसेच काही तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी महापालिकेने समन्वयकांची नेमणुक करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या विषयात महापालिकेची अनास्था प्रकर्षांने पुढे आल्यावर महापौरांनी या कामात काही अडचणी आल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. फेब्रुवारी अखेपर्यंत सर्व वाहतूक बेटांचे काम पूर्णत्वास नेण्याचे निर्देशही अ‍ॅड. वाघ यांनी दिले. या संदर्भातील आढावा बैठक १५ फेब्रुवारी रोजी होणार असून या संदर्भात समन्वयक म्हणून कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.