महिला पोलीस कर्मचाऱ्यास अश्लील एसएमएस पाठवून लैंगिक छळ करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. अमृता आकोलकर या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आयुक्तालयातील तीन अधिकारी लैंगिक शोषण करीत असल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती. त्यानंतर एका समितीमार्फत केलेल्या चौकशीत डॉ. भाजीभाकरे दोषी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस निरीक्षक सरोजिनी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे व अन्य दोन वरिष्ठ अधिकारी लैंगिक छळ करीत असल्याची तक्रार अमृता आकोलकर यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती. वस्तुस्थिती तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. यात विशाखा समितीच्या सदस्य भारती भांडेकर व महिला तक्रार निवारण केंद्राच्या सरोजिनी कदम यांचा समावेश होता.
या समितीने केलेल्या चौकशीदरम्यान डॉ. भाजीभाकरे यांनी अमृता आकोलकर या महिला पोलीस कर्मचाऱ्यास अश्लील एसएमएस पाठविल्याचे पुरावे समोर आले. या चौकशीचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे पाठविण्यात आला होता. त्याची दखल घेत पोलीस महासंचालकांनी डॉ. भाजीभाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले. गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी कोण हा प्रश्न गेल्या पाच दिवसांपासून चर्चेत होता. तक्रारदार आकोलकर गायब असल्याने त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली होती. त्या न सापडल्याने बुधवारी रात्री पोलीस निरीक्षक सरोजिनी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ५०९ अन्वये सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान रात्रीच्या वेळी अमृता आकोलकर व डॉ. भाजीभाकरे यांचे मोबाईल टॉवरचे स्थान तपासण्यात आले होते. तसेच तिने दिलेला जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिगही करण्यात आले होते. या गुन्हय़ाचा तपास प्रभारी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया हे करणार आहेत.
दरम्यान, याच प्रकरणातून चिपळूण येथे बदली करण्यात आलेल्या डॉ. भाजीभाकरे यांच्या निलंबनाचा प्रस्तावही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनास पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.