दहा टक्के लोकवर्गणी भरल्यानंतर सरकारकडून मिळालेल्या यशवंत ग्रामसमृद्धी योजनेतून उपसा सिंचन योजनेचे काम अर्धवट ठेवून त्यावर खडांबे खुर्द (ता. राहुरी) येथील माजी ग्रामसेवक व माजी सरपंचानेच डल्ला मारला. राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरकारने यशवंत ग्रामसमृद्धी योजना सुरू केली. रस्ते, उपसा योजना, पूरक पाणीयोजना आदीसाठी गावकऱ्यांनी १० टक्के लोकवर्गणी जमा करून जिल्हा परिषदेमार्फत सरकारकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर निधी उपलब्ध होत असे. गावसमृद्ध व्हावे म्हणून हाती घेतलेल्या या योजनेत अनेक ठिकाणी ग्रामसेवक व सरपंचच समृद्ध झाले. त्यामुळे आता ही योजना बंद केली नसली तरी ती गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे.
खडांबे खुर्द येथील गावकऱ्यांनी कालव्यावर उपसा योजना राबवून शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचविण्यासाठी यशवंत ग्रामसमृद्धी योजनेतून १० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला. त्यामध्ये गावकऱ्यांनी दीड लाखाची लोकवर्गणी जमा केली. साडेआठ लाख रुपये सरकारचा निधी आला. सन २००६ ते २०१२ या कालावधीत ग्रामसेवक राजेंद्र रामदास जाधव व सरपंच श्यामराव खेतमाळसकर हे होते. त्यांनी योजनेची अंमलबजावणी करताना गैरप्रकार केले. काम १० लाखाचे झाल्याचे दाखवून बिले काढली. प्रत्यक्षात काम ७ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे झाले होते. तत्कालीन विस्तार अधिकारी विजय तऱ्हारे यांनी याप्रकरणी चौकशी केली असता हा घोटाळा उघड झाला. मूल्यांकनातही तसे आढळून आले. गैरप्रकारात अडकलेला ग्रामसेवक जाधव याची बदली करण्यात आली असून तो आता संगमनेर तालुक्यात कार्यरत आहे. गटविकास अधिकारी उज्ज्वला बावके-कोळसे यांनी याप्रकरणी तब्बल दीड वर्षांनंतर कारवाईचे आदेश दिले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापूसाहेब फुलारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, ग्रामसेवक जाधव व माजी सरपंच खेतमाळसकर यांच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांनी मिळून ग्रामसमृद्धी योजनेत सुमारे २ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.