‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचे सावट
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ अर्थात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईचे सत्र सुरू केले आहे. अनिल सोनवणेवर त्या अंतर्गत एक वर्षांसाठी स्थान बद्धतेची कारवाई केली गेली असून पुढील आठ दिवसात आणखी काही जणांवर कारवाईचे संकेत आहेत. यामुळे गुन्हेगारी पाश्र्वभूमी लाभलेल्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिने पोलिसांनी जवळपास ६० कुख्यात गुन्हेगारांच्या तडिपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगितले गेले होते. तथापि, ही कारवाई करण्याचे इशारे निवडणुकीच्या वेळी का दिले जातात, कारवाई होते की नाही याबद्दल शहरात चर्चा सुरू होऊन शंका उपस्थित केल्या जात होत्या. यापूर्वी लोकसभा, विधानसभा किंवा नगरपालिकांच्या बऱ्याच निवडणुकांचा कार्यकाळ पाहता प्रत्येकवेळी पोलीस कारवाईचे इशारे देतात. परंतु, प्रत्यक्षात किती जणांवर कारवाई होते, याची माहिती दिली जात नाही. किंबहुना राजकीय दबावामुळे तशा कारवाईचे सत्र दडपले गेल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर, गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी सध्या चालविलेली मोहीम चर्चेचा विषय ठरली आहे. जुलै महिन्यात तयार केलेल्या तडिपारीच्या प्रस्तावावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. पोलिसांनी यावेळी सोनवणेवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतीची कारवाई केली. त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवाना केल्याने अन्य गुन्हेगारी पाश्र्वभूमी लाभलेल्या राजकीय मंडळींमध्ये खळबळ उडाली आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, दरोडय़ाचा प्रयत्न, घरात घुसून मारहाण करणे, खंडणी गोळा करणे, दहशत माजविणे, घातक शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे १८ दखलपात्र गुन्हे व चारवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या सोनवणे विरुद्ध ही कारवाई करण्याचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेने ठेवला होता. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत आठ गुन्हेगारांविरुद्ध ही कारवाई केली गेली असून शहरातील काही आजी-माजी नगरसेवकही कारवाईच्या कक्षेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सोनवणेवरील कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून अन्य संशयितावर भीतीचे सावट पसरले आहे. १ सप्टेंबर रोजी महापालिकेसाठी मतदान होणार असून ‘एमपीडीए’च्या कारवाईचा कक्षेत असलेले काही आजी-माजी नगरसेवक, माजी महापौर स्वत: निवडणूक रिंगणात आहेत किंवा त्यांच्या पत्नी तरी निवडणूक
लढवित आहेत.