शेतकऱ्यांना संरक्षण दिल्याशिवाय शेती व्यावसायाला स्थैर्य मिळणे शक्य नसल्याने बदलते हवामान आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून हवामानावर आधारित पिक विमा योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. कोणत्या परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत याचा निर्णय घेण्यासाठी राज्यात मंडलनिहाय उभारण्यात येणाऱ्या २ हजार १०० स्वयंचलीत हवामान केंद्रांमधून मिळणारी माहिती आता एसएमएसद्वारे मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रमांतर्गत विविध कृषी औजारे वितरण आणि शिवसाई मंदिराचे भूमिपूजन विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास तांबे, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, संचालक शांतीनाथ आहेर, सरपंच योगिता िशदे, उपसरपंच संदीप कडलग, प्रातांधिकारी संदीप निचीत, तहसीलदार शरद घोरपडे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, गेल्यावर्षी पावसाअभावी पेरण्या उशिरा झाल्याने पीक विमा हप्ता भरण्याची मुदत वाढवून घेतली. तलाठय़ांचा संप असतांनाही कृषी सहाय्यकांना अधिकार देऊन जिल्हा बँकेच्या शाखा उशिरापर्यंत चालू ठेवल्यानेच जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभाग घेता आला. त्यामुळेच जिल्ह्याला ९१ कोटी रुपये मिळू शकले. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी विविध योजनांची माहिती दिली.