टाटा उद्योग समूहाचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. उद्योगपती जेमशेटजी टाटा यांनी वस्त्रोद्योगाची उभारणी केली आणि नागपुरात एम्प्रेस मिल सुरू करून विदर्भाच्या विकासाकडेही लक्ष दिले. टाटा उद्योग समूह खासगी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करीत असून सरकारच्या नव्या धोरणातून विदर्भाचा विकास शक्य आहे, अशी अपेक्षा टाटा उद्योग समूहाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस मिस्त्री यांनी काही मिनिटांच्या नागपूर भेटीत व्यक्त केली.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’ औद्योगिक गुंतवणूक परिषदेत सोमवारी उद्घाटनानंतरच्या सत्रात अचानक आगमन झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचे महत्त्वाचे भाषण झाले. या परिषदेत आजची त्यांची उपस्थिती अत्यंत आशादायी ठरली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मित्री यांना सन्मानाने व्यासपीठावर आणले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. चर्चेत फारसा वेळ न घालवता स्वागतानंतर लगेच त्यांनी भाषण सुरू केले. टाटा उद्योग समूह देशात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असून विकासाची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे, असा उल्लेख त्यांनी केला.
राज्यात पिंपरी चिंचवड, पुण्यात या समूहाने उद्योग सुरू केले आहेत. ऊर्जा क्षेत्रातही ‘टाटा पॉवर’ भरीव काम करीत आहे. सौर तसेच औष्णिक उर्जा निर्मिती केली जात आहे. मुंबई, पुण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही सेवा पुरविली जात आहे. यामध्ये सहाशे कोटीवर गुंतवणूक झाली आहे. नागपूरचा झपाटय़ाने होत असलेला विकास लक्षात घेता मेडिकल चौकात टाटा व्हीआरजीकडून मोठा गृह प्रकल्प उभारला जात आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक केली जात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता टाटा समूहाने मिळविली असून महाराष्ट्रातही विकासाला मोठी संधी असून संपूर्ण महाराष्ट्र जोडण्यावर आमचा विशेष भर आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. देशात विविध ठिकाणी वैद्यकीय आणि इतर सुविधा उपलब्ध करून ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) पार पाडण्यातही टाटा समूहाने मोठे योगदान दिले आहे. सरकारचे विकासाबाबतचे धोरण पारदर्शी असावे. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ औद्योगिक परिषदेच्या माध्यमातून सरकार विकासाकडे लक्ष देत आहे.
सरकारच्या सकारात्मक धोरणातून विदर्भाचा विकास शक्य आहे, असे मिस्त्री म्हणाले. त्यांच्या भेटीने या परिषदेत चैतन्य आले. विदर्भाच्या विकासासाठी आता नव्याने किती कोटींची गुंतवणूक करणार आहोत, हे सांगायचे मात्र त्यांनी टाळले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2013 रोजी प्रकाशित
विदर्भाच्या विकासाबाबत सायरस मिस्त्री आशावादी
टाटा उद्योग समूहाचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. उद्योगपती जेमशेटजी टाटा यांनी वस्त्रोद्योगाची उभारणी केली आणि नागपुरात एम्प्रेस मिल सुरू करून विदर्भाच्या विकासाकडेही लक्ष दिले.
First published on: 26-02-2013 at 03:05 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyrus mistry is hopeful for development of vidharbha