कधीकाळी काकडी, टरबूज आणि खरबूज यांच्या वेलांनी संपूर्णपणे झाकोळल्या जाणाऱ्या मोसम नदीपात्रात आता मात्र अगदीच तुरळक ठिकाणी ‘डांगरवाडी’ चे अस्तित्व दिसून येत आहे. पूर्वी मोसम नदी बारमाही वाहात असे. परंतु काही वर्षांपासून नदी पावसाळ्यातही वाहाणे बंद झाल्याने भरपूर पाणी लागणारे काकडी, टरबूज यांसारखे पीक घेणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर लाभदायक ठरणारी ही फळबाग मोसम खोऱ्यात शेवटच्या घटका मोजत आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी मोसम खोरे ऐन प्रगतीच्या शिखरावर होते. उगमस्थानी पावसाचे प्रमाण अधिक राहात असल्याने मोसम नदी बारमाही वाहात असे. हरणबारीच्या धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बागलाणपासून मालेगावपर्यंतचा नदीकाठचा परिसरा सुजलाम सुफलाम् करत असे. उन्हाळ्यात नदीतील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर पात्रात टरबूज, काकडी आणि डांगर यांची लागवड केली जात असे. नदीपात्रातील या फळबागा ‘डांगरवाडी’ म्हणूनच प्रसिध्द आहेत. डांगरवाडय़ांचे प्रमाण तेव्हा अधिक होते.
नदीपात्रातील पाण्यामुळे डांगरवाडय़ा चांगल्याच फुलत असत. अवघ्या दोन महिन्यांच्या कष्टात या फळबागांमधून उत्पन्न मिळत असल्याने उत्पादकांची चांगलीच कमाई होत असे. काही उत्पादक तर दुसऱ्या राज्यांमध्येही टरबूज विक्रीसाठी पाठवित. पावसाचे प्रमाण कमी होऊन नदीतील पाण्याचे प्रमाणही कालांतराने कमी होत गेले. बारमाही वाहणारी नदी पावसाळ्यातही कोरडी दिसू लागली. हरणबारी धरणातून पाणी सोडल्यावरच नदी वाहताना दिसू लागली. या सर्वाचा परिणाम डांगरवाडय़ांवर झाला. पाण्याअभावी डांगरवाडय़ा जिवंत ठेवणे कठीण झाले. त्यामुळे उन्हाळ्यात नियमितपणे या फळबागा घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाऊन मोसम खोऱ्यात ही संख्या अगदीच तुरळक राहिली आहे. तुरळक प्रमाणामुळे त्यांचे संरक्षण करणेही कठीण झाले आहे. मोसम नदीपात्राचे सौंदर्यच जणूकाही त्यामुळे लोप पावले आहे.
डांगरवाडय़ांच्या रूपाने नदीपात्र हिरवेगार दिसत असे. परंतु डांगरवाडय़ा नाहिशा झाल्याने नदीपात्र आता बकाल दिसू लागले आहे. मोसम खोऱ्यातील डांगरवाडय़ांची एक संस्कृतीच नामशेष होऊ लागली आहे. डांगरवाडय़ांमुळे उत्पादकांच्या हातात अत्यंत कमी अवधीत पैसा येत असे. त्यामुळे ही संस्कृती पुन्हा एकदा भरभराटीस आणण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणाऱ्या डांगरवाडय़ांसाठी उन्हाळ्यात धरणातून नियमितपणे पाणी सोडल्यास डांगरवाडय़ा पुन्हा एकदा बहरू शकतात.
नदीकाठी शेती असणारे काही जणांनी आपल्या शेतात टरबूजाची लागवड केली आहे. टरबूज शेतीतूनही शेतकऱ्यांना चांगल्यापैकी आर्थिक फायदा होत असल्याने पाणी असणाऱ्यांचा कल या कालावधीत टरबूज शेतीकडे वळू लागला आहे.