* जि. प.चा बट्टाबोळ केल्याचा काँग्रेसचा आरोप     
*  विरोधकांचा त्रागा नराश्यामुळे -राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषदेचा गेल्या एक वर्षांत बट्टय़ाबोळ करण्याचेच काम राष्ट्रवादीने केल्याचा घणाघाती आरोप जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्य व विरोधी पक्षेनेते प्रताप राठोड यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष व राकॉं नेते प्रवीण देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन एक वर्षांच्या विकास कामाचा जो आढावा सादर केला त्याचा प्रताप राठोड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
यंदाचे वर्ष जिल्हा परिषदेचे सुवर्ण जयंती महोत्सव वर्ष आहे, तसेच हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने अनेक उपक्रम राबवण्याच्या घोषणा अध्यक्षांनी केल्या होत्या, मात्र जिल्ह्य़ातील १६ पंचायत समित्यांमध्ये व १२३० ग्राम पंचायतींमध्ये वर्षभरात एकही कार्यक्रम घेण्यात आला नाही. जिल्हा परिषद म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजून सत्तारूढ राकांॅ कारभार करीत असल्याची टीका प्रताप राठोड यांनी केली.  
जिल्हा परिषद सभागृहातील वार्ताहर परिषदेत बोलतांना राठोड म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी आपल्या पुत्रप्रेमापोटी ययाती नाईक यांना उपाध्यक्ष केले खरे, मात्र ययाती नाईक म्हणजे एखाद्या चित्रपटात जसा पाहुणा कलाकार असतो तसे ययाती नाईकांचे वागणे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या कृषी खात्याचा बट्टय़ाबोळ झाला आहे. बंगला, गाडी, आणि जिल्हा परिषदेत एक केबिन घेऊन ययाती नाईक सत्ता उपभोगत आहेत, पण काम मात्र कवडीचेही करत नसल्याचा ठपका ठेवून राठोड म्हणाले की, सुवर्ण जयंती महोत्सवी वर्षांचे कोणतेच नियोजन करण्यात आलेले नाही. मनरेगा अंतर्गत सर्वाधिक भ्रष्टाचार यवतमाळ जिल्ह्य़ातच झाला आहे. पाणीपुरवठा योजनांपकी ५० टक्के योजना पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा परिषद अध्यक्ष करतात जो पूर्णत खोटा असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. ७० टक्के योजना भ्रष्टाचारांनी पोखरलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची अवस्था तर आणखीच वाईट आहे. ९० टक्के शाळा ड श्रेणीमध्ये आहेत. अ, ब श्रेणीत, तर ३, ४ टक्के सुध्दा नसल्याचा आरोप प्रताप राठोड यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आणि राज्यभर गाजावाजा करण्यात आलेल्या वसंत एॅगोटेक प्रदर्शनी-२०१३ च्या आयोजनावरही विरोधी पक्षनेते राठोड यांनी टीका केली. या आयोजनात विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नाही. प्रदर्शनीवर झालेल्या खर्चाचा तपशील जाहीर केला नाही. वसंत एॅग्रोटेक प्रदर्शनीसाठी झालेल्या खर्चासाठी कृषी केंद्रांच्या संचालकांकडून आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात वसुली करण्यात आल्याचा आरोप राठोड यांनी केला. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असूनही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री मनोहर नाईक यांचे जिल्हा परिषदेवर अजिबात नियंत्रण नसल्याचे व परिणामत जिल्हा परिषदेचा बट्टयाबोळ झाला असल्याचे प्रताप राठोड यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचा ढेपाळलेला कारभार लक्षात घेता जिल्हा परिषद बरखास्त करून नव्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही राठोड यांनी केली.

आरोप फेटाळले
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते प्रवीण देशमुख यांनी प्रताप राठोड यांचे सर्व आरोप लेखणीच्या एका फटकाऱ्यात फेटाळून लावले. जिल्हा परिषदेने वर्षभर केलेल्या विकास कामाचा आढावा देशमुख यांनी पत्रकारांसमोर सादर केला. प्रताप राठोड विरोधी पक्षात असल्यामुळे आणि काँग्रेस गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच सत्तेबाहेर असल्यामुळे आलेल्या नराश्यातून प्रताप राठोड यांनी निराधार आरोप केल्याचे प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.