यंदाच्या दीपावलीसाठी आवश्यक असलेल्या शोभीवंत गृहसजावटीच्या वस्तू, सुंदर व देखणे कपडे, विविध राज्यांतील महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तू,  हस्तकलावंतांनी घडविलेल्या दीपमाळा आदींचे प्रदर्शन आणि विक्री सध्या सीबीडी बेलापूर येथील अर्बन हाटमध्ये भरविण्यात आलेल्या दीपमेळा महोत्सवात सुरू असून २० ऑक्टोबपर्यंत हा मेळा ग्राहकांसाठी खुला आहे.
हातमाग व हस्तकौशल्याच्या विविध वस्तू दीपमेळ्यात उपलब्ध आहेत. चांदीचा मुलामा दिलेल्या धातूंच्या मूर्ती तसेच टेराकोटा प्रकारातील मातीच्या दीपमाळा, सुगंधित मेणबत्त्या, हातमागाने बनवलेले आकाशकंदील असे अनेकविध पर्याय ही दीपमेळ्याची आकर्षणे ठरली आहेत.
पंजाब, हरयाणा, काश्मीर, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील हातमागाचे ड्रेस मटेरियल तसेच बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक व जम्मू काश्मीर या राज्यांतील सिल्क तसेच सुती साडय़ाही मेळ्यात विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत. तागाच्या आणि बांबूच्या वस्तू, दगडापासून बनवलेल्या कलाकुसरी, चित्रे, कृत्रिम दागिने, गालिचे व आकर्षक शिल्पेही मेळ्यात मांडण्यात आली आहेत. नैसर्गिक दागिने, नक्षीदार दिवे, बनारसी आणि कॉटन साडय़ा, बेडशीटस, डोअर मॅटस, फर्निचर, ड्रेस मटेरिअल, महिला व पुरुषांचे शर्ट, कुर्ता, चामडय़ांच्या बॅगा, चप्पल आणि बूट्स, पडदे, कारपेट आणि विविध प्रकारचे हातमाग उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खवय्यांसाठी स्वतंत्र खाद्यगृहाचीही व्यवस्था  आहे.