रस्ता चौपदरीकरणामुळे सुखरूप प्रवासाच्या सुविधा मिळणार असल्या तरी त्याची वाट बघतांना किती निष्पाप जिवांनी प्राण गमवावे, याचे उत्तर कोणाकडेच नाही. संबधित अधिकारी व कंत्राटदारांच्या मनमानीमुळे खामगाव-जालना या मार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे.
खामगाव-जालना रस्ता चौपदरीकरणाच्या कामात वारंवार काम रखडणे, झालेले काम पुन्हा उखडणे, असे प्रकार घडत राहिल्याने चौपदरीकरण स्वप्नवत ठरत आहे. काम सुरू झाले तेव्हापासून उखडलेला रस्ता व पुलाच्या नवीन बांधकामामुळे या मार्गावर वाहनचालकांना कमालीची कसरत करून रत्याचे अंतर कापावे लागत आहे. पूर्वीचा रस्ता नाहीसा झाल्यामुळे तोंडपाठ असणारा रस्ता विस्मृतीत गेला. कुठे खड्डा, कुठे गिट्टीचे, मातीचे ढीग, कुठे पुलाचा मोठा खड्डा अचानक समोर येत असल्याने अपघातांची मालिका या रस्त्यावर सुरू झाली. दोन ते अडीच वर्षांत निष्पापांचे जीव जाण्याचे अर्धशतक पूर्ण होऊन आता त्याची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.
याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदार गंभीर नसल्याचे प्रत्येक अपघातामुळे सिध्द झाले आहे. चिखली, वाकी फाटा, धोत्रा नंदई, सरंबा, देऊळगावमही, टाकरखेड भागीले, रोहणा फाटा, आळंद फाटा, असाला, दगडवाडी सिनगाव फाटा, भिवगाव व त्यापुढे जालन्याकडे जाणाऱ्या मार्गावर प्रत्येक ठिकाणच्या परिसरात झालेल्या अपघातात जवळपास पन्नासवर जीव गेले आहेत. कित्येकांना अपंगत्व आले.
कुणाच्या वंशाचा दिवा, घराचा आधार नाहिसा झाला, तर कुणी आईच्या प्रेमाला कायमचे मुकले. याला जबाबदार कोण, याचा विचार कुणी करायचा? अशीच परिस्थिती कायम राहिली तर निष्पाप जीवांचे शतकच पाहण्याची संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची इच्छा आहे काय, असा प्रश्न सद्या उपस्थित होत आहे.
भिवगाव फाटय़ापुढे व वाघरूळ या मार्गावर आन्टीच्या ढाब्याजवळ, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न याप्रमाणे नवीन काम काही वर्षांंपासून सुरू आहे. कंत्राटदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी काही मुदत आहे की नाही, हेच कळेनासे झाले आहे. रस्ता खोदून ठेवला. मोठय़ा खड्डय़ावर लोखंडी अ‍ॅंगल टाकून जाळी तयार केली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुलाच्या कामाकडे सरळ वाहने येऊ नये, यासाठी संबंधित कंत्राटदारांनी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आणि अपघाताची मालिका सुरू झाली. या पुलावर वाहने कोसळून चार ते पाच जणांचा बळी गेला. संबंधित कंत्राटदार काम कसे करतो, विलंब का होतो? काम बंद का झाले? याचा जाब आता जनतेने विचारण्याची वेळ आली आहे. जालना किंवा चिखलीकडून येणारी वाहने रस्ता सरळ असल्याच्या भावनेने येतात पण, अपघात हेाऊन दगडाचा गंभीर मार लागून जागीच मरण पावतात.
२३ मे रोजी गौतम झोटे या युवकाचा मोटारसायकल खड्डय़ा पडल्याने डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि या गौतमसारखेच अजून किती जणांना बळी पडून आपल्या जिवाला मुकावे लागणार व किती जणांच्या नशिबी अपंगत्व येणार, याचे उत्तर आता येणारा काळच ठरवेल एवढे मात्र खरे!