वालधुनी पुलाचे काम सुरू असताना पुलाचा काही भाग शुक्रवारी रात्री कोसळला. यामुळे पुलाच्या कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सतत वर्दळीचा हा उड्डाण पूल असणार आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खासदार आनंद परांजपे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
या प्रकरणात ठेकेदार, महापालिका अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे खासदार परांजपे यांनी महापालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. रात्रीची वेळ असल्याने मोठी हानी टळली. पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी करण्यात यावी. त्याचा अहवाल लोकप्रतिनिधी, नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी खा.परांजपे यांनी केली आहे.
दरम्यान, कामातील भ्रष्टाचार, टक्केवारीचे राजकारण आणि सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर नसलेला अंकुश तसेच प्रशासनाचे ठेकेदारावर नसलेले नियंत्रण या गोंधळातून ही घटना घडली असल्याचे परांजपे म्हणाले. वालधुनी ते काटेमानिवली उड्डाण पुलाचे बांधकाम कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराकडून २००८ पासून सुरू आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजता या पुलाच्या काही भागात स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक पुलाला आधार देणारी पट्टी घसरल्याने पुलाचा एक टप्पा कोसळला. पूल कोसळण्यापूर्वीच आवाज येऊ लागल्याने तीन कामगार तेथून पळाले पण कठडय़ावर उभे राहिल्याने ते जखमी झाले. तसेच पुलाच्या बाजूला असलेले दोन नागरिक गंभीर जखमी झाले.
स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना पालिकेच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी, उपअभियंता खरे, विश्वास, ठेकेदाराचे अभियंते घटनास्थळी उपस्थित नव्हते.