अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित असलेल्या जिरायती भागाला निळवंडे धरणाचे पाणी लवकरात लवकर मिळावे, यासाठी साईबाबा संस्थानने निधी उपलब्ध करुन द्यावा असा प्रस्ताव कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साईबाबा संस्थान समोर ठेवला आहे.
गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे औरंगाबाद येथील कार्यकारी संचालक अ. भा. पाटील, अधिक्षक अभियंता ना. ल. सावळे, कार्यकारी अभियंता ग. भा. नान्नोर आणि जीवन प्राधिकरणाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत विखे बोलत होते. ते म्हणाले, निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र मुख्यत्वे जिरायत आहे. हे शेतकरी अनेक वषार्ंपासून या धरणातील पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र निधी व अन्य कारणांनी या धरणाच्या कामाला विलंब झाला आहे. आता धरण पुर्ण होऊन ५ टीएमसीपर्यंत पाणी साठविण्यात येत असले, तरी कालव्यांची कामे रखडली आहेत. लाभक्षेत्रातील जनतेला लवकर पाणी मिळणे गरजेचे आहे.
शिर्डीतील स्थानिक लोकांसह देशविदेशातून भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे साईबाबा संस्थान व शिर्डी नगरपंचायत यांच्यावर मोठय़ा प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी मिळण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तथापि जिरायत भागातील जनतेला प्राधान्याने पाणी मिळणे गरजेचे असल्याने साईबाबा संस्थानने कालव्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. हा प्रस्ताव संस्थानने मान्य केल्यास रखडलेली कालव्यांची कामे मार्गी लागतील, शिर्डीलाही नवा स्त्रोत निर्माण होईल असे त्यांनी म्हटले आहे.