शहरात वारंवार मोर्चे निघत असल्याने व आंदोलन होत असल्याने त्यांच्यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र पोलीस चौकीची गरज भाकपचे राजू देसले यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. निवेदनात आंदोलनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीबीएस ते मेहेर सिग्नल या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग आहे. तसेच वाहनतळासाठी जागा राखीव करण्यात आली आहे. त्यामुळे बराचसा रस्ता व्यापला जातो. त्यातच काही ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. सीबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल या दरम्यान ‘नो पार्किंग झोन’ केल्यास व रिक्षावाल्यांना शिस्त लावल्यास वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊ शकेल. हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी स्टेडियम यादरम्यानच्या जागेत जानेवारी २०१३ पर्यंत मोर्चाचे विसर्जन होत असे. परंतु जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी त्याविरोधात निर्णय घेतल्यामुळे मोर्चा कुठे विसर्जित करावा, हा प्रश्न आंदोलकांसमोर निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळही मोर्चाची समाप्ती होत असे. परंतु हे आवारही आता कुलूपबंद करण्यात आले आहे.
मैदानाचे नुकसान होऊ नये याची काळजी सर्वानी घेणे गरजेचे असले तरी हुतात्मा स्मारकाबाहेरील भाग ते मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार या भागाचा मोर्चा विसर्जित करण्यासाठी योग्य पद्धतीने वापर होऊ शकतो. दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस मोर्चा निघणार नाही याची दक्षता आंदोलकांनी घ्यावयास हवी. मोर्चे शक्यतो बी. डी. भालेकर मैदान अथवा गोल्फ क्लब मैदान येथून निघतात. त्याच ठिकाणी मोर्चेकऱ्यांना नेत्यांची भाषणे झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकरी रेंगाळण्याची गरज राहणार नाही. मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळ नेण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणीही देसले यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. सततच्या आंदोलनांमुळे पोलिसांचा ताण वाढतो. त्यामुळे आंदोलन व मोर्चे हाताळण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे अथवा चौकी व पुरेसे कर्मचारी बळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. लोकशाही देशात मोर्चे, आंदोलने निघतच राहणार असल्याने शहरातील वाहतूक व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी समन्वयाची भूमिका घ्यावी. या महत्त्वाच्या प्रश्नावर पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांची बैठक घेण्याची मागणीही देसले यांनी केली आहे.