शहरातील उच्चभ्रू वस्तीतील घरकामास ठेवलेल्या अल्पवयीन मुलीला घरात डांबून तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या घटनेतील मुख्य संशयित पॉल शिरोळेसह या प्रकरणात सहभागी महिलांवर पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांच्याकडे महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार संघ आणि शिंपी समाज संस्थेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली
मनमाड येथील मुलींच्या वसतीगृहात गतवर्षी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीस पुढील शिक्षणासाठी वसतीगृहातून सुमन रणदिवे यांनी नाशिकला आणण्याचा बहाणा केला. तिला घरकामासाठी उज्ज्वला नागरिक (रा. उषा अपार्टमेंट, संभाजी चौक) यांच्या घरी ठेवण्यात आले. दरम्यान, नागरीक बाहेरगावी गेल्यानंतर पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत बांधकाम व्यावस़्ाायिक तथा एका पतसंस्थेचा संचालक असलेल्या पॉल जोसेफ शिरोळे याने तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगू नको अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिली.
तीन महिन्यापासून अत्याचाराने त्रस्त अल्पवयीन मुलीने धाडस करून गत आठवडय़ात आपल्या ठाणे येथील आतेबहिणीला भ्रमणध्वनिवरून सदर प्रकार कथन केला. याची दखल घेऊन आतेबहिणीने नाशकात येऊन गंगापूर पोलिसांना सदर प्रकार सांगितला. त्यानंतर दोघा महिलांना ताब्यात घेण्यात आले.  या घटनेतील मुख्य संशयित पॉॅलचा तपास पोलीस घेत आहेत.
या प्रकरणात पीडित मुलीस मोठय़ा रकमेचे आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न घटनेतील संशयित दोघी महिला व संबंधित नातेवाईक करत आहेत. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा त्वरित तपास करून आरोपीस कडक शासन करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश समस्त शिंपी समाजाचे अध्यक्ष अरूण नेवासकर, अशोक सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक महिला विभागीय संघटक अमृता पवार, पल्लवी शिंपी आदींनी दिला आहे.