येथील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी आज दलित संघटनांनी बंदचे आव्हान केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोकले यांच्या निषेधार्थ वकील संघटनेनेही मंगळवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला.  
ढोकले यांनी महिला वकील रूपाली चव्हाण यांना सोमवारी जातिवाचक शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली होती. त्याचे तीव्र पडसाद कर्जतमध्ये उमटले. त्यांच्यावर कारवाईसाठी आज आरपीआय, समता अधिकार आंदोलन, भारत मुक्ती मोर्चा आदी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. या आंदोलनास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.
दलित संघटनांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चामधील कार्यकर्त्यांनी ढोकले व प्रभारी तहसीलदार जैयसिंग भैसडे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पोलीस ठाण्यासमोर जाहीर सभा झाली. या वेळी  आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी चव्हाण यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करून दलितांवरील अन्याय भीमसैनिक सहन करणार नाहीत असा इशारा दिला. निळकंठ ठोसर, अंकुश भैलुमे, विक्रम कांबळे, सोमनाथ भैलुमे, हरीश भैलुमे आदींची या वेळी भाषणे झाली.
 चव्हाण यांनी अपमानास्पद वागणुकीच्या घटनेची माहिती दिली. पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ढोकले यांच्यावर अॅट्रॉसिटी करण्याचा अधिकार आपल्याला नाही हे स्पष्ट केले. याबाबतचा अहवाल आपण वरिष्ठांना पाठवून देणार आहोत असे ते म्हणाले. ज्येष्ठ वकील कैलास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली वकील संघटनेची बैठक झाली. संघटनेचे अध्यक्ष शरद कदम, बाळासाहेब शिंदे, सुरेश शिंदे, दीपक भंडारी आदी या बैठकीला उपस्थित होते. ढोकले यांचा निषेध करून संघटनेने आज न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला.