राज्यात सर्वत्र थैमान घालणारा डेंग्यू आजार तालुक्यातही दाखल झाला असून घोटी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रूग्णात डेंग्यूसदृश्य लक्षणे आढळून आली आहे. या रूग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्यात नऊ आरोग्य केंद्र असून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून या आजारासंदर्भात प्रबोधन करण्यात येत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात दिवसेंदिवस डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढ होत असताना आणि डेंग्यूला रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत असताना इगतपुरी तालुक्यात मात्र शासकीय पातळीवर या आजाराची कोणतीही गंभीर दखल घेतली गेल्याचे दिसून येत नाही. या आजाराविषयी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचीही गरज यंत्रणेला वाटत नसल्याने डेंग्यू हळूहळू तालुक्यातही शिरकाव करू लागला आहे. संपूर्ण घोटी शहराच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या काननवाडी आरोग्य केंद्रातील कर्मचारी या आजारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृतीचा एक भाग म्हणून नागरिकांना सूचना देण्याकडे घोटीकडे फिरकतही नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
परिणामी घोटी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका युवकाच्या तपासणीत डेंग्यूसदृश्य आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पाणीसाठा आणि डासांची उत्पत्ती असलेल्या ठिकाणी औषध टाकणे किंवा गप्पी मासे सोडले जातात. परंतु काननवाडी आरोग्य केंद्रात या औषधांचा पुरेसा साठा नसल्याने त्याऐवजी रॉकेल टाकण्याची सूचना करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या आरोग्य केंद्रात गप्पी मासे पैदासही केंद्र नाही. अशा सर्व प्रकारच्या समस्या असतानाही तालुका वैद्यकीय अधिकारी परिस्थितीकडे दुर्ल्रक्ष करत असून कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ग्रामीण भागात अजूनही डेंग्यू नेमका कशामुळे होतो, याविषयी बहुतेकांना माहिती नाही. खेडय़ांमध्ये वीज भारनियमनाच्या अनिश्चित वेळांमुळे ग्रामस्थांना घरात पाणी भरून ठेवणे भाग पडते. पुढील नळपाणी पुरवठा होईपर्यंत भरलेले पाणी तसेच ठेवण्यात येते. डेंग्यूचे डास जादा दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यात होत असल्याने अशाप्रकारे साटवून ठेवलेले पाणी डेंग्यूच्या डासांसाठी पोषक ठरते. यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याची गरज असताना आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांकडून या आजाराविषयी पुरेसे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. केवळ इगतपुरी तालुक्यापुरतीच आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल ही तक्रार आहे असे नव्हे तर, नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात अशीच स्थिती दिसून येत आहे. ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, अधिकारी खरोखर जनजागृतीचे काम करत आहेत किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक दौरे काढून पाहणी करण्याची गरज आहे. कामचुकारपणा करणआऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई होणे आवश्यक आहे. या आजाराचा दिवसेंदिवस अधिक फैलाव होण्याच्या कारणांमध्ये जनजागृतीचा अभाव हेही एक कारण असल्याने या आजारास रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिकाधिक जनजागृती करण्यावर भर देण्याची आवश्यकता नागरिकांकडून मांडण्यात येत आहे.