कात्रजजवळील भिलारेवाडीचे उपसरपंच संतोष धनावडे (वय ३५) यांच्यावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हा खून राजकीय किंवा स्थावर मालमत्तेच्या वादातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने शहर गुन्हे शाखा व ग्रामीण पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून लवकरच
आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात चौघांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनावडे हे आपल्या मित्रासोबत शिंदेवाडीकडून शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून परत येत होते. कात्रज घाटातील पहिल्या वळणावर त्यांना एका मोटारीने धडक दिली. या मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविले आणि धनावडे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले व मोटारीत बसून पळून गेले. धनावडे व त्यांच्या मित्राला तत्काळ भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान धनावडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांना मोटारीचा व आरोपींचा माग
लागला आहे. काही संशयितांकडे पोलिसांची चौकशी सुरू आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणी
राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय बाठे हे अधिक तपास करत आहेत. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले की, या प्रकरणी संशयितांची नावे पोलिसांना समजलेली आहेत. हल्ल्यानंतर मोटार कोणत्या दिशेने गेली. याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली असून त्या दिशेने मोटारीचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना अटक केली जाईल.