समाजकार्यासाठी प्रसिध्द असलेल्या येथील धडपड मंचने शिक्षणासाठी रोज आठ किलोमीटर पायपीट करणाऱ्या एका विद्यार्थिनीस रक्षा बंधनदिनी सायकल भेट देऊन तिचा उत्साह वाढविला आहे.
शहरालगत बदापूर गाव असून तेथील पूजा राऊळ ही येवल्याच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे.  इतर मैत्रिणी सायकल किंवा इतर साधनांचा वापर करून शाळेत येत असताना पूजा मात्र कमकूवत आर्थिक परिस्थितीमुळे दररोज पायीच शाळेत ये-जा करते. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांसह भावडांना मदत करणे, जनावरांची देखभाल करणे यांसह घरातील इतर सर्व कामे करून ती शाळा गाठते. होतकरू मुलीची शिक्षणाबाबतची ओढ आणि निकड लक्षात घेऊन धडपड मंच या सेवाभावी संस्थेचे प्रणेते प्रभाकर झळके यांच्या प्रेरणेने पूजाला ३५०० रुपयांची सायकल भेट देण्यात आली. रक्षा बंधनाच्या पाश्र्वभूमीवर मिळालेली ही भेट अमूल्य असल्याचे पूजाने म्हटले आहे.
बालाजी मंदिराच्या आवारात अमोलचंद समदडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अपंगांनाही तीन चाकी सायकल देण्यात येणार आहे. यावेळी बी. के. बाफना, नारायण शिंदे, प्रभाकर अहिरे, दत्ता नागडेकर आदी उपस्थित होते.