जिल्ह्य़ातील राजकीयदृष्टय़ा बहुचर्चित सिरसाळा गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबासाहेब काळे यांनी भाजपचे उमेदवार सय्यद अनितुन्नीसा निसार यांचा १९८ मतांनी पराभव केला. मुंडे कुटुंबातील राजकीय फाटाफुटीमुळे भाजप आमदार पंकजा पालवे आणि भाजप बंडखोर आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण धनंजय मुंडे यांनी हा विजय मिळवून भाजपकडील जागा खेचून घेतली.
परळी पंचायत समितीच्या या गणातील सदस्याचे अपघाती निधन झाल्याने रविवारी या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. भाजपच्या उमेदवार सय्यद अनितुन्नासा निसार यांना ३ हजार ६४२, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबासाहेब काळे यांना ३ हजार ८४० मते मिळाली. भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याशी बंड करून आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. राजकीय फुटीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. तालुक्यात एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीपासूनच त्यांनी तयारी केली. नाथ्रा ही ग्रामपंचायत मिळून धनंजय यांनी बांधणी केली.
सिरसाळा पोटनिवडणुकीत आमदार पालवे तळ ठोकून होत्या, तर खासदार मुंडे लक्ष ठेवून होते. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या विजयासाठी स्थानिक नेत्यांची मोट बांधली. राजकीय कौशल्य पणाला लावले आणि भाजपची जागा खेचून घेतली. धनंजय मुंडे यांनी तालुक्याच्या राजकारणात पहिलाच विजय मिळवला. वैद्यनाथ साखर कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या सिरसाळा गणात भाजपचा पराभव झाल्याने खासदार मुंडे यांनाही धक्का बसला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2013 रोजी प्रकाशित
सिरसाळ्यात धनंजय मुंडेंची बाजी
जिल्ह्य़ातील राजकीयदृष्टय़ा बहुचर्चित सिरसाळा गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबासाहेब काळे यांनी भाजपचे उमेदवार सय्यद अनितुन्नीसा निसार यांचा १९८ मतांनी पराभव केला.

First published on: 25-06-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde to succeed in sirsala