डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत्या २९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सोलापुरात येत असताना दुसरीकडे हे नाटय़गृह पुरातत्त्व कायदा व संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा वाकवून उभारण्यात आल्याचा वाद अखेपर्यंत कायम राहिला आहे. या वादात आता धनगर समाज सेवक संघानेही उडी घेत राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे.
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यालगत महापालिकेच्या जुन्या भगिनी समाज परिसरात डॉ. फडकुले प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. फडकुले नाटय़गृहाची उभारणी करण्यात आली आहे. परंतु यात पुरातत्त्व कायदा वाकविण्यात आला असून इतर कायदेही धाब्यावर बसवून प्रशासकीय यंत्रणेला झुकविण्यात आले आहे. याबाबत आम आदमी पार्टीचे संस्थापक-सदस्य विद्याधर दोशी यांनी आवाज उठविल्यानंतर हे आरोप डॉ. फडकुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास फुटाणे व सचिव विष्णुपंत कोठे यांनी फेटाळले होते. परंतु त्यानंतरसुध्दा या वादाची धूळ अद्याप खाली बसली नाही, तर उलट त्यात धनगर समाज सेवक संघानेही उडी घेतली आहे.
डॉ. फडकुले नाटय़गृहाची उभारणी ज्याठिकाणी झाली, त्या भगिनी समाजाच्या जुन्या इमारतीला महापालिकेने यापूर्वीच अहल्यादेवी होळकरांचे नाव दिले आहे. प्रवेशद्वारावर तसा कायदेशीर नामफलकही लावण्यात आला होता. परंतु या नामफलकापुढे डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहाचा नामफलक बेकायदेशीरपणे लावण्यात आल्याचा आरोप धनगर समाज सेवकसंघाचे राज सलगर व मनोज मुदलियार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. अहल्यादेवी होळकरांच्या कायदेशीर नामफलकापुढे डॉ. फडकुले नाटय़गृहाचा बेकायदेशीर नामफलक उभारण्यात आल्याने धनगर समाजाच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली. हा बेकायदा नामफलक तातडीने काढण्यासाठी महापालिकेला काल बुधवारीच २४ तासांची मुदत देण्यात आली होती. आता यासंदर्भात समाजाच्या सर्व मान्यवरांची व कोअर कमिटीची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे सलगर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेस भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील, नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.