पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सतत पाठीशी घातल्याने स्वपक्षीय नगरसेविकेच्या घरावर सशस्त्र हल्ला करणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक चंद्रकांत सोनार आणि त्याचा गुंड मुलगा देवेंद्र उर्फ देवा सोनार या पिता-पुत्रांवर मोक्कातंर्गत कारवाई करावी या मागणीसाठी नगरसेविकेसह समर्थकांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जुन्या धुळ्यातील नागरिकांतर्फे हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेविका ललिता आघाव, माजी नगरसेवक रवींद्र काकड, गड्डय़ा आघाव, श्रीरंग काकड यांच्यासह अमित सोंडले, प्रदीप सांगळे, अरविंद काकड, आशू सानप, प्रशांत फटकळ, विशाल सानप, चेतन डोमाळे, चंद्रकांत गिते, राजेंद्र डोमाळे, राजेंद्र आघाव आदी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर १६ डिसेंबर रोजी रात्री अशोक आघाव, रवींद्र आघाव हे दोघे बंधु घरात जेवण करीत असताना चंद्रकांत सोनार, देवा सोनार, भूषण सोनार हे तिघे पिता-पुत्र सहकाऱ्यांसह मद्यधुंद अवस्थेत हातात हत्यारे घेऊना आघाव बंधुंच्या घरावर चाल करून आले. ‘तुम्ही आमच्यामुळे निवडून आलात. त्यामुळे आमच्यापुढे लोटांगण का घातले नाही’ अशी विचारणा करीत आघाव कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले होते.
या घटनेमुळे देवा सोनार व त्याच्या सहकाऱ्यांच्या गुंडगिरीचा प्रत्यय आला. या हल्ला प्रकरणी जामिनावर सुटलेल्या देवा सोनार व त्याच्या सात-आठ गुंड मित्रांनी १९ जानेवारी रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास अशोक आघाव, रवींद्र आघाव या दोघांच्या घरावर लाठय़ा-काठय़ा, दगडांनी व कोयत्याने हल्ला करून घराचे दार तोडले.
 घरातील सामानाची नासधूस केली. कुटुंबातील महिलांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
देवा सोनारविरूध्द कारवाई करण्यास पोलीस यंत्रणा कचरत असल्याचा आरोप केला जात असून कितीही गुंडगिरी केली तरी पक्षाकडूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे या गुंडगिरीस वैतागलेल्या परिसरातील नागरिकांनी अखेर मंगळवारी पोलिसांकडे धाव घेतली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सोनार पिता-पुत्रांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.