धर्माच्या व रुढीच्या बेडय़ा झुगारून तरवडी (ता. नेवासे) सारख्या गावातून सत्यशोधकी पत्रकारिता करणारे आद्य ग्रामीण पत्रकार मुकुंदराव पाटील हे विसाव्या शतकातील प्रती महात्मा फुले आहेत, असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले यांनी केले.
नगर प्रेस क्लब व न्यू आर्टस महाविद्यालय यांच्या वतीने मुकुंदराव पाटील यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रा. उगले यांचे ‘मुकुंदराव पाटील यांची पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान झाले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार पांडुरंग अभंग, उत्तमराव पाटील, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, उपप्राचार्य डॉ. एम. व्ही. गीते, शिवाजी साबळे यावेळी उपस्थित होते. प्रा. उगले यांनी पाटील यांच्या जीवनकार्याचा विस्ताराने आढावा घेत प्रती महात्मा फुले म्हणून पाटील यांचा गौरव केला. कुलकर्णी लिलामृत, हिंदू धर्म व ब्राम्हण शेटजी प्रताप यासारखे ग्रंथ लिहून पाटील यांनी तत्कालीन समाजावर लादलेल्या अनेक जाचक, अवमानास्पद रुढींवर कोरडे ओढले. महात्मा फुले, कृष्णराव भालेकर यांचा वारसा त्यांना मिळाला होता. त्याच्याशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. ग्रामीण भागातून दीनमित्र चालवून त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली, ते म्हणजे एक चालतेबोलते विद्यापीठच होते, असे प्रा. उगले यांनी सांगितले.
पत्रकार सुधीर लंके यांनी प्रास्ताविक केले. महेश देशपांडे, अशोक निंबाळकर यांनी स्वागत केले. विठ्ठल लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बापू चंदनशिवे यांनी आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार भास्करराव डिक्कर, प्रा. जवाहर मुथा, प्रा. भांगे, येठीकर, रविंद्र सातपुते, असीफखान दुलेखान आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.