चुकांनी शहाणपण शिकविले

दीपिका पदुकोण या नावाभोवती ग्लॅमर, आकर्षण, अफेअर्स आणि तिला सातत्याने मिळालेले यश पाहून ती भाग्यवान वगैरे असल्याची अनेकांची श्रद्धा

दीपिका पदुकोण या नावाभोवती ग्लॅमर, आकर्षण, अफेअर्स आणि तिला सातत्याने मिळालेले यश पाहून ती भाग्यवान वगैरे असल्याची अनेकांची श्रद्धा अशा अनेक चित्रविचित्र गोष्टींचं अजब कोंडाळं निर्माण झालं आहे. ती यशस्वी मॉडेल होतीच. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘ओम शांती ओम’ हा शाहरूखबरोबरचा चित्रपट मिळणं, त्याला मिळालेलं अतोनात यश आणि त्याबरोबर बॉलीवूडमध्ये तिचं निर्माण झालेलं स्थान या सगळ्या गोष्टी तिच्या हुशारीमुळे झाल्या. तिच्याकडे पाहून तिचा आत्मविश्वास, तिचा सहज वावर, स्पष्ट विचार या सगळ्या गोष्टी समोरच्याला आकर्षित करतात. तिच्या हातून कधीही वावगं होणार नाही, असा विश्वास आपल्याला वाटतो. पण, तिच्याशी बोलल्यानंतर ती या सगळ्यांच्या अगदी विरुद्ध आहे हे जाणवतं कारण, आपण दिसतो तसे नाही हे दीपिकाच आपल्याला स्पष्टपणे सांगते आणि चुकांच्या बाबतीत तर माझ्या चुकांनीच शहाणपण शिकवलं आहे असं तिचं म्हणणं आहे. बॉलीवूडची सर्वात सुंदर आणि आघाडीची अभिनेत्री दीपिकाला जाणून घेण्याचा हा छोटा प्रयत्न..
दीपिका सध्या ‘राम लीला’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात मग्न आहे. त्यामुळे सध्या ती संजय लीला भन्साळींच्या ‘राम लीला’त पूर्णपणे रंगलेली आहे, दंगलेली आहे.. त्याचे कारण ते स्वत:च आहेत, असे दीपिका सांगते. संजय लीला भन्साळींबरोबर मी कधी काम केलं नव्हतं किंवा ते प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत हे माहिती असलं तरी ते दिग्दर्शक म्हणून  नेमके कसे आहेत हेच माहीत नव्हतं. त्यामुळे ‘राम लीला’ करताना शिकण्याची एक नवीन प्रक्रिया सुरू झाली होती. भन्साळी खूप विचारी आहेत, आपल्या कलाकृतीवर त्यांचं एवढं प्रेम आहे की कलाकृती निर्माण होत असताना त्याच्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना अद्भुत, वेगळं असं काही मिळत नाही तोवर ते समोरच्याला काम करायला लावतात. त्यामुळे ‘राम लीला’ चित्रपट करत असताना प्रत्येक दृश्यासाठी ओरडा खावा लागला आहे, खूप वेळ घ्यावा लागला आहे, कधी रडूही आलं आहे. पण, ही त्यांची पद्धत आहे कारण त्याशिवाय प्रेक्षकांना त्या भव्यपटातूनही नेमकी काळजाला भिडणारी गोष्ट देता येणं शक्य नाही, असं आता माझं ठाम मत झालं आहे. ‘राम लीला’ करताना त्यातली प्रत्येक गोष्ट, कलाकार, सेट इतकं  नसानसात भिनलं आहे की, जोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होत नाही तोपर्यंत त्यातून बाहेर पडण्याची मुभाही त्यांनी दिलेली नाही.. असं दीपिका हसून सांगते.
पण, ‘राम लीला’ हे नाव अजब वाटत नाही, असं विचारताच ही प्रेमकथा आहे ती क ोणाचीही असू शकते. यात राम आणि लीलाच्या प्रेमाची गोष्ट आहे आणि नावातल्या वेगळेपणापासूनच चित्रपटाच्या कथेची सुरुवात होते ना.. पण, तरीही राम या नावावर जाऊ नका म्हणजे मग पुढे सीता येणार नाही. ही आजच्या काळातील राम नावाच्या मुलाची आणि लीला नावाच्या मुलीची गोष्ट आहे आणि ती गुजरातच्या पाश्र्वभूमीवर घडते, यापेक्षा वेगळं मी काहीही सांगणार नाही, असेही ती स्पष्टपणे सांगते. ‘राम लीला’च्या ओघानेच विषय सुरू असल्याने गाडी रणवीर सिंगवर येणं साहजिक आहे आणि तशी ती येते तेव्हा दीपिकाच्या चेहऱ्यावर मोठं हसू असतं आणि ती आनंदाने रणवीरबद्दल सांगत सुटते. रणवीर हा माणूस म्हणूनच अजब रसायन असल्याचं ती सांगते. रणवीर कधीच अभिनय करत नाही. त्याचा स्वभावच मोकळाढाकळा आहे. काहीही विचार न करता बोलणं, मनाला वाटेल ते बोलणं, वाटेल ते करणं, वाटेल तसे कपडे घालणं अशा सगळ्या गोष्टी तो करतो आणि त्याला त्याच्या या वागण्याबद्दल कधीच वाईट वाटत नाही, चुकीचं वाटत नाही हे त्याचं विशेष आहे. असं सगळ्या चौकटी मोडून वागणं कोणाला सहज जमत नाही ते खूप अवघड असतं. त्याच्याकडे ते नैसर्गिकच आहे त्यामुळे त्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि हाच त्याचा जो सहजस्वभाव आहे तो पडद्यावरही व्यक्त होतो. त्यामुळे तो इतर कोणत्याही कलाकारापेक्षा वेगळा वाटतो, असं दीपिका सांगतच असते..म्हणजे मी बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे पण, बऱ्याचदा कलाकार हे स्वार्थी असतात. ते सहकलाकाराची छाप पडेल असं काहीही होऊ देत नाही. रणवीरच्या अभिनयात मात्र देवाणघेवाण आहे. त्याच्याबरोबर काम करताना साद-प्रतिसादाला वाव मिळतो त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणाऱ्याला आपलाही एक ठसा उमटवता येतो आणि केमिस्ट्रीही साधली जाते.. दीपिकाच्या या कौतुकामुळे रणवीरबरोबरच्या तिच्या अफेअरच्या गप्पांना खरंच अर्थ आहे, असा विचार आपल्या मनात एकीकडे दृढ होत असतो. पण, ती मात्र या विषयांवर आपल्याला खेळवत ठेवते.
माझ्या आयुष्यात घडलेल्या चुकांनी मी आता पुरती शहाणी झाले आहे, असं ती सांगते. मला एखाद्याचा स्वभाव आवडला म्हणून तसं नाव जोडलं जाणं चुकीचं आहे. समोरचा माणूस आहे तसा स्वीकारला की तुम्हालाही त्याच्याशी संवाद साधणं सोपं होतं, असं ती सांगते. म्हणून मग ‘राम लीला’ करताना रणवीरचा सहज वावर उपयोगी पडला तर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ करताना शाहरूख खानने आपल्याला कितीतरी मदत केली आहे, असं दीपिका सांगते.
दीपिका खूप ग्लॅमरस आहे असं म्हटल्यावर ती अजिबात नाही.. असं सांगते. कॅमेऱ्याची मला नेहमी भीती वाटते. मी खूप सुंदर कपडे घालते किंवा फॅशनचा विचार करते असंही नाही. किंबहुना, या गोष्टी सहजपणे घडल्या. त्या लोकांना आवडल्या आणि म्हणून आपला आत्मविश्वास वाढला, असे तिचे म्हणणे आहे. ‘रेस २’, ‘कॉकटेल’, ‘यह जवानी है दिवानी’.. कधी मीरा, कधी वेरॉनिका, कधी नैना या सगळ्या व्यक्तिरेखा आजच्या स्त्रीच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. त्यामुळे मला असेच व्यावसायिक चित्रपट आवडतात, कारण ज्याला आपण मसाला म्हणून हिणवतो त्या भावभावना आपल्या संस्कृतीत आहेत आणि तशाप्रकारच्या भावनिक क था पडद्यावर रंगवायला आपल्याला जास्त आवडतात, हे ती स्पष्टपणे सांगते. अभिनेत्री म्हणून यश मिळवण्यासाठी नायिकाप्रधान चित्रपटच असले पाहिजेत, त्यात वास्तवतेची कास असली पाहिजे, हे विचारच आपल्याला मान्य नसल्याचे ती सांगते. व्यावसायिक चित्रपटात आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम करतानाही आपले अस्तित्व जाणवून देणे हे खरे आव्हान आहे आणि ‘ओम शांती ओम’ ते ‘चेन्नई एक्स्प्रेस’पर्यंत सगळ्या व्यावसायिक चित्रपटातून एक ग्लॅमरस आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावल्याचा आपल्याला अभिमान आहे. त्याच दिशेने पुढची वाटचाल सुरू राहील, असा सूचक इशारा दीपिका देते. यंदाची दिवाळी दीपिकासाठी खरंच शुभ असली तरी निदान ती यावर्षी तरी कुटुंबाबरोबर साजरी करता यावी, यासाठी सगळे बेत आखलेल्या दीपिकाची बंगळुरू एक्स्प्रेस पुन्हा तिच्या कामांमुळे आणि मुख्यत: ‘राम लीला’मुळे मुंबई ते दुबई अशी वळती झाली आहे. पण, यशाची कमान कायम राखण्यासाठी हेही नसे थोडके.. असे तिचे म्हणणे आहे.
‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये मीनाम्माच्या भूमिकेसाठी मी जो हेल पकडला आहे तो मिळवण्यासाठी शाहरूख माझ्याबरोबर तासन्तास बसला होता. रोहितने जेव्हा मीनाम्मामध्ये दीपिका डोकावता कामा नये, हे स्पष्ट केलं तेव्हा शाहरूखने मला बाजूला घेऊन काही शब्द वेगवेगळे हेल काढून बोलायला लावले. किती वेगवेगळ्या हेलमध्ये आपल्याला बोलता येऊ शकेल हे तो स्वत: शोधत होता आणि मलाही शोधायला लावत होता.. त्यातूनच मग आम्हाला हा मीनाम्माचा ‘कहाँ से खरिदी ऐसी बोकवास डिक्शनरी..’चा सूर गवसला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dipika padukon learns from mistakes