शहरातील नऊ रात्र निवाऱ्यांमध्ये अस्वच्छता असून काही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष नारायण कुचे यांनी गुरुवारी तीन रात्र निवाऱ्यांना भेटी दिल्या. एका रात्र निवाऱ्याच्या देखभालीसाठी स्वयंसेवी संस्थेला प्रतिमाह २८ हजार ५०० रुपये दिले जातात. मात्र, त्याची देखभाल नीट होत नसल्याचे या पाहणीदरम्यान स्पष्ट झाल्याने सर्व नऊ रात्र निवाऱ्यांचा अहवाल सादर करावा, अशा सूचना कुचे यांनी महिला व बालकल्याण विभागाला दिल्या.
शहरात रेल्वे स्थानक, घाटी, मिटमिटा व अन्य ठिकाणी रात्र निवारे सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेच्या ज्या इमारती वापरल्या जात नव्हत्या, तेथे हे निवारे सुरू करण्यात आले. या निवाऱ्यात स्वच्छता राहावी तसेच महिला आणि पुरुषांना स्वतंत्र राहता यावे म्हणून स्वयंसेवी संस्थांमार्फत व्यवस्थापक नेमण्याची कार्यवाहीही अभिप्रेत आहे. काही संस्थांनी स्त्रियांच्या रात्र निवाऱ्याला पुरुष व्यवस्थापक नेमले आहेत. बहुतांश निवाऱ्यांच्या भोवताली कमालीची घाण आहे. आज मंजूरपुरा भागात भेट दिली सभापती कुचे यांना घाण आढळून आली. साफसफाई करण्यासाठी एवढी मोठी रक्कम देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या निवाऱ्यांची चौकशी करून अहवाल द्यावा, असे त्यांनी कळविले आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासमवेत उपायुक्त रवींद्र कदम व महिला बालकल्याण विभागाचे कर्मचारी जोशी उपस्थित होते.